मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री, आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Ashish Shelar on CM Uddhav Thackeray) यांच्या एकेरी उल्लेखाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “मी व्यक्तीगत कुणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र तरीही जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो” असं आशिष शेलार (Ashish Shelar on CM Uddhav Thackeray) म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन टीका करताना, आशिष शेलार यांनी कायदा लागू न करणं म्हणजे तुझ्या बापाचं राज्य आहे का, असं म्हटलं होतं. त्याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं.
“मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे त्यावर ठाम आहोत. त्या सवालातील भाषेमुळे जर कोणाचा अपमान झाला असेल तर त्याची क्षमाही मागू, क्षमा मागतो. पण सवाल आमचा जो आहे, तो स्पष्ट आहे, अफजल गुरुची बरसी मनवणारे, संविधानाचा अपमान करणारे, भारत तेरे तुकडे तुकडे म्हणणारे, शरजीलच्या समर्थनार्थ जाणारे, या सर्वांच्या मागे जो जो राजकीय पक्ष राहील, तो संविधानाच्या विरोधात उभा आहे. त्याला आम्ही खडे सवाल करत राहू”, असं आशिष शेलार म्हणाले.
आशिष शेलार काल नेमकं काय म्हणाले होते?
शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. आज सरडा सुद्धा आत्महत्या करेल असा रंग शिवसेनेने बदलला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? असं आशिष शेलार म्हणाले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी याबाबतचं भाष्य केलं.
आशिष शेलार आज काय म्हणाले?
दरम्यान, कालच्या या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी आज स्पष्टीकरण दिलं. “मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही. पण भाषेमुळे जर कोणाचा अपमान झाला असेल तर त्याची क्षमाही मागू, क्षमा मागतो”, असं शेलार म्हणाले.
मुलाखतीवरुन टीकास्त्र
आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीवरुनही टीकास्त्र सोडलं. “पहिल्या मुलाखतीतून राज्याचा रोड मॅप असेल असं वाटलं होतं, मात्र ही महाविकास आघाडी कशी झाली याचा खुलासा करणारी ही मुलाखत होती. ही मुलाखत सपशेल फेल ठरली आहे. राजकीय हेतूने घेतलेला हा महाविकास आघाडीचा निर्णय होता, दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांना त्याचा खुलासा करावा लागत आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी चांद तारे मागितले की नाही याबाबत मी भाष्य करणार नाही. पण ‘चाँद तारेच्या’ झेंडेवाल्यांसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे हे स्पष्ट दिसतंय, असा टोला शेलारांनी लगावला.
आम्हाला कोणाला हिंदुत्व शिकवायचं नाही. पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही विचारणार. जे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे ते दिसतंय का असा प्रश्न आहे. राजकीय हेतूने घेतलेले निर्णय कसे पचवता येत नाहीत हे यातून दिसतंय, असं शेलार म्हणाले.
अनंतकुमार हेगडेंचं विधान असंयुक्तीक
कर्नाटकातील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी गांधींजींबाबत केलेलं विधान संयुक्तीक नाही. महात्मा गांधी यांचे काम सगळ्या देशाला माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार 150 जयंती साजरी करत असताना हेगडे यांचं हे वक्तव्य योग्य नाही, असं आशिष शेलार म्हणाले.
संबंधित बातम्या
आशिष शेलारांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांविरोधात एकेरी शब्दात टीका