कटुता संपवण्यासाठी कामाला लागा; सामनामधून फडणवीसांना साद?

| Updated on: Oct 28, 2022 | 9:47 AM

ठाकरे गटाकडून 'सामना'तून फडणवीसांना साद घालण्यात आली आहे. राजकारणतील कटूता संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

कटुता संपवण्यासाठी कामाला लागा; सामनामधून फडणवीसांना साद?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाकडून ‘सामना’तून (SAMANA) फडणवीसांना साद घालण्यात आली आहे. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी ऐन दिवाळीत सामोचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून, मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते व जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. विजयानंतर आनंद होत असला तरी उन्माद चढणे हे प्रौढत्वाचे लक्षण मानले जात नाही. श्री फडणवीस यांच्यात नव्या सत्तांतरापासून प्रौढपण आलं असल्याचे जाणवू लागले आहे’,असं सामनामध्ये म्हटलं आहे.

दोन महत्त्वाचे मुद्दे

सामनामध्ये पुढे म्हटलं आहे की, ‘दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले. फडणवीस यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यावर महाराष्ट्राने विचार करायला हवा महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबूल केले’.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटावर निशाणा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत.या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल. शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली, पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले?’, असं म्हणत आजच्या अग्रलेखातून शिंदे गटावरही निशाणा साधण्यात आला आहे.