औरंगाबाद : “राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी तलवार म्यान केली आहे. ‘मातोश्री’बाहेर त्यांनी केलेलं वक्तव्य खोटं आहे. मी त्यांना जालन्याला भेटायला जाणार होतो, पण मी त्यांची भेट रद्द केली आहे. अर्जुन खोतकर आता लोकसभा लढणार नाहीत,” असा दावा काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांचे मैत्रीचे संबंध आहेत.
14 मार्चला अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांची औरंगाबादेत भेट झाली होती. शिवाय अर्जुन खोतकरांबद्दल दोन दिवसात गुड न्यूज मिळेल, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला होता. पण अर्जुन खोतकर यांनी आज मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यानंतरही त्यांनी लोकसभा लढण्याचा दावा कायम ठेवला होता. जागा मिळाल्याशिवाय समाधान नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
अर्जुन खोतकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचंही बोललं जात होतं. अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर हे चांगले राजकीय मित्र मानले जातात. त्यामुळेच आपण जालन्याला जाऊन अर्जुन खोतकरांची भेट घेऊन गुड न्यूज देणार असल्याचंही सत्तार म्हणाले होते.
दरम्यान, आपण शिवसेना कधीही सोडणार नाही, असं अर्जुन खोतकरांनी अनेक वेळा सांगितलं होतं. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत जालन्याची जागा भाजपकडे आहे. त्यामुळे ही जागा आपल्याला द्यावी, अशी खोतकरांची मागणी होती. याबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं खोतकर म्हणाले होते.