नवी दिल्लीः मराठवाड्याचे (Marathwada Shivsena) माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे खोतकर यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र टीव्ही9 च्या प्रतिनिधींनी नुकतीच थेट खोतकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या चर्चांना फेटाळून लावलं आहे. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला आलो होतो. मागील वेळेस तसेच या वेळीदेखील योगायोगाने मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. मात्र मी एकनाथ शिंदे गटात गेलेलो नाही. मी शिवसैनिक असून शिवसेना प्रमुखांशी एकनिष्ठ आहे, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली. आज नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अर्जुन खोतकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना वाढल्या होत्या.
दिल्लीत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अर्जुन खोतकर यांनी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अर्जुन खोतकर म्हणाले, ‘ मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला आलो होतो. मागच्या वेळेस आणि या वेळेस योगायोगाने मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. मी शिंदे गटात सहभागी झालेलो नाही , त्यांच्याकडून कुठलाही दबाव नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा सैनिक. मुख्यमंत्र्यांच्या भेटी वेळी सगळेच खासदार होते त्यात रावसाहेब दानवेही होते, अशी प्रतिक्रिया अर्जून खोतकर यांनी दिली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा नुकताच औरंगाबाद दौरा झाला. औरंगाबाद शहरातील मेळाव्यात आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे यांच्याह व्यासपीठावर अर्जुन खोतकरदेखील उपस्थित होते. मात्र दुसऱ्याच दिवशी ते दिल्लीत एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले दिसून आले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच अर्जुन खोतकर आणि मला एकत्र बसवलं, असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दिल्लीतील या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दोघांना एकत्र बसवून आता मागचं सगळं विसरून जा, असं सांगितलं. मी त्यांच्या मागे ईडी लावलेली नाही, हे आता त्यांना विचारा. तसेच कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत, हेही त्यांना विचारा, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.