नवी दिल्ली : ‘एम्स’ रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे एम्समध्ये जाणार आहे. अरुण जेटली यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.
अरुण जेटली यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 9 ऑगस्ट रोजी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आलं. त्यावेळी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी एम्समध्ये जाऊन विचारपूस केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनीही एम्समध्ये जाऊन जेटलींची विचारपूस केली. त्याशिवाय अवघ्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जेटलींच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी एम्समध्ये जाऊन विचारपूस केली होती.
अरुण जेटली यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. एक आठवड्यापूर्वीच एम्सने जेटलींचं हेल्थ बुलेटीन जारी करत प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मात्र आजपर्यंत त्यांच्या प्रकृतीची काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
66 वर्षीय अरुण जेटली हे मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. जेटलींची किडनी प्रत्यार्पण झाली आहे. आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांच्याकडील अर्थ खात्याचा भार पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता. यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात जेटली उपचारासाठी परदेशात गेले होते. त्यामुळे ते अंतरिम बजेटही मांडू शकले नव्हते.
मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तेव्हा जेटलींनी पत्र लिहून प्रकृतीच्या कारणास्तव कोणतीही जबाबदारी किंवा मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता.
अरुण जेटलींच्या प्रकृतीबाबत स्पष्ट कोणी बोलण्यास तयार नाही. मात्र वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फुप्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. जेटलींना मधुमेह अर्थात डायबेटीजही आहे. त्यात त्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे. शिवाय त्यांना पेशींचा कर्करोगही झाला होता. त्याआधी त्यांच्यावर लठ्ठपणा कमी करण्यासाठीही शस्त्रक्रिया झाली होती.