इटानगर : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या फक्त दोन जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशातही विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपचे तीन उमेदवार विजय झाले आहेत. दोन विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यातील दिरांग मतदारसंघातून भाजपचा तिसराही उमेदवार विजयी झाल्याचं भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव यांनी म्हटलंय.
BJP has won 3rd Assembly seat in Arunachal. Phurpa Tsering won from Dirang seat uncontested after two other candidates have withdrawn their nominations.
— Ram Madhav (@rammadhavbjp) March 28, 2019
यापूर्वी दुसरी जागा जिंकल्याची माहिती राम माधव यांनी मंगळवारी दिली होती. सर केंटो जिनी आलो पूर्व विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले होते. शिवाय इंजिनीअर ताबा तेदिव हे देखील येचुली विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्याने भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलंय.
Another victory also from Arunachal Pradesh:
Er Taba Tedir won unopposed from 16 Yachuli Assembly segment.
(These two victories are for Arunachal Pradesh Assembly, which goes to polls together with parliament on 11 April)— Ram Madhav (@rammadhavbjp) March 26, 2019
अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूकही होत आहे. इथे लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या 60 जागा आहेत. सध्या भाजपचीच सत्ता असलेल्या अरुणाचल प्रदेशात 11 एप्रिल रोजी विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान होईल. पेमा खांडू सध्या अरुणाचलचे मुख्यमंत्री आहेत.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आलो पूर्व विधानसभेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता. छाननीनंतर काँग्रेसचे उमेदवार मिनकिर लोलेन यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. त्यामुळे केंटो जिनी यांचाच एकमेव वैध अर्ज आहे. 28 मार्चच्या नंतरच या उमेदवारांनी विजयी घोषित केलं जाईल, कारण 28 मार्च उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
भाजप अरुणाचल प्रदेशातील सर्वच्या सर्व 60 जागांवर निवडणूक लढत आहे. पण निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला होता. कारण, भाजपच्या तब्बल 20 नेत्यांनी एनपीपी या पक्षात प्रवेश केला होता, ज्यात दोन मंत्री आणि सहा आमदारांचाही समावेश आहे. काँग्रेसनेही इथे जोर लावला आहे. अरुणाचलमधील प्रादेशिक पक्ष एनपीपी 33 जागांवर, जेडीएस 18 आणि जेडीयू 13 जागांवर निवडणूक लढवत आहे.