पुणे : लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होत आहे. यातील पाच टप्पे पार पडले आहेत. पण मतदान झालेल्या जागांवर कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक उमेदवार आपापले समीकरणं जुळवत आहे. शिरूरमध्ये तर शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याच अहवालाचा हवाला देत 90 हजार ते एक लाख मतांनी निवडून येण्याचा दावा केलाय.
शिरूरमध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पहिल्यांदाच अमोल कोल्हे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान मिळाले. त्यामुळे कोणीही जिंकून येऊ शकेल असा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. पण आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी मात्र 90 हजार ते एक लाख मतांनी निवडून येऊ असा दावा केलाय. प्रशांत किशोर यांच्या टीमने तब्बल एक लाख लोकांचा सर्व्हे केलाय आणि त्यातून हा निष्कर्ष आल्याचा दावा आढळराव पाटील यांनी केला.
आढळराव पाटील यांनी यासाठी कोणताही कागदी पुरावा दिला नसला तरी प्रशांत किशोर यांनी थेट सांगितल्याचा दावा केला. आढळराव पाटील त्यांच्या विजयावर ठाम आहेत. तर अमोल कोल्हे यांच्याकडूनही विजयाचा दावा केला जातोय. या मतदारसंघातला प्रचार शिगेला पोहोचला होता. आता निकालापूर्वी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
व्हिडीओ पाहा :