लोकसभा निवडणुकीमध्ये ठकारे गटाला अनपेक्षित असे यश मिळाले. या विजयामुळे खूश झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातील 288 जागांपैकी 125 जागा लढवण्याची तयारी ठकारे गटाने केली आहे. शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, सुनील प्रभू आणि राजन विचारे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत प्रमुख विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची रणनीती तयार करण्यावर एकमत झाले. मात्र, शिवसेनेच्या या दाव्यामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांची अडचण होणार आहे.
नुकतीच विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली. ज्यामध्ये ठाकरे गटाच्या उद्धव गटाची 15, अपक्ष एक आणि काँग्रेसच्या 7 मतांपैकी त्यांना 6 मते मिळाली. त्यामुळे फक्त एका मताने त्यांना विजापासून दुर ठेवले होते. पण, दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे त्यांच्या विजयाचा सुकर झाला. नार्वेकर यांना काँग्रेसच्या मतांमुळे विजय मिळाला असे दिसत असले तरी मतदानाच्या आदल्या रात्री मोठे राजकीय नाट्य घडले होते.
विधान परिषद निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला यांची बैठक झाली. या बैठकीला कॉंग्रेस आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख नेते तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) प्रमुख नेते उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर की शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले होते. यातील एका गटाने उद्धव गटाला तर दुसऱ्या गटाने जय्नात पाटील यांना पाठिंबा दिला. मात्र. याचमुळे नार्वेकर यांना धोका निर्माण झाला होता. अखेर, उद्धव ठकारे यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आणि नार्वेकर यांचा विजय झाला.
विधान परिषद निवडणुकीतील हा अनुभव पाहता ठाकरे गटाने आतापासूनच आक्रमक पवित्र घेतला आहे. ठाकरे यांनी या बैठकीमध्ये 125 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या जागांना लक्ष्य करण्यासाठी समर्पित ‘थिंक टँक’ असलेली वॉर रूम स्थापन करण्याचा विचारही करत असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले. शिवसेना (UBT) मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या फरकाच्या आधारावर या जागांवर दावा करणार आहे. याशिवाय, या मतदारसंघांची अ, ब आणि क अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करणार आहे.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने NDA मध्ये असताना 124 जागा लढवल्या होत्या. भाजप आणि इतर मित्र पक्षांसाठी 163 जागा सोडल्या होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी 22 जागांवर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत राहून तितक्याच जागांवर निवडणूक लढवली होती.
लोकसभेसारखाच फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीत पक्षाला स्वीकारायचा आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमव्हीएच्या प्रभावी कामगिरीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष 150 पेक्षा कमी जागांवर समाधान मानणार नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी यापूर्वीच सांगितले होते. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, अविभाजित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) अनुक्रमे 56 आणि 54 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या.