मुंबई : शालेय शिक्षण मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar on Sharad Pawar) यांनी पवार कुटुंबीयांवर तुफान हल्ला चढवला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेलार (Ashish Shelar on Sharad Pawar) यांनी राज्य सहकारी बँक घोटाळ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांना लक्ष्य केलं.
शेलार म्हणाले, “गेल्या काही दिवसात एका कुटुंबाचं नाट्य समोर आलं. 11 हजार कोटींच्या राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा कसा असं अजितदादा म्हणाले. या आकड्यांची स्पष्टता देण्यासाठी म्हणून मी आकडेवारी देतो. हे म्हणाले अजितदादा यांचं नाव होतं म्हणून गुन्हा दाखल झाला. पण खरं तर कर्ज समितीचे सदस्य म्हणून 8 वेळा कोर्टाने त्यांचं नाव घेतलं आहे”.
पवार व्हाईट कॉलर क्रिमिनल : आशिष शेलार
एक चित्रपट आलेला ठग्स ऑफ हिंदुस्थान हे तर ठग्स ऑफ ठेवीदार आहेत. हा पवार परिवार ठग्स काका पुतण्याचा आहे. शरद पवार यांचं नाव का आलं हे आम्हला विचारलं जातं, पण कोर्टानेच 4 वेळा त्यांचं नाव घेतलं आहे. पवार हे व्हाईट कॉलर क्रिमिनल आहेत, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.
बाबांना त्रास झाल्याने मुलीने राजीनामा दिला नाही?
या सगळ्या प्रकारामुळे आम्हला पहिल्यांदा कळलं की काकांना त्रास झाला म्हणून पुतण्याने राजीनामा दिला. पण बाबांना त्रास झाला म्हणून मुलीने राजीनामा दिला नाही, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळेंवर केला.
तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे बुडवले. तुम्ही शेतकऱ्यांचे ठग्स आहात. आणि हेच मुद्दे आम्ही निवडणुकीत घेऊन जाणार आहोत, असा आक्रमक पवित्रा आशिष शेलार यांनी घेतला.