Maharashtra Cabinet Expansion : भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार? चंद्रकांत पाटलांना मंत्रीपद, तर शेलारांकडे राज्याची जबाबदारी जाण्याची शक्यता

| Updated on: Aug 08, 2022 | 6:06 PM

चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना फोन गेलाय आणि त्यांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ आता आमदार आशिष शेलार यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Cabinet Expansion : भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार? चंद्रकांत पाटलांना मंत्रीपद, तर शेलारांकडे राज्याची जबाबदारी जाण्याची शक्यता
आशिष शेलारांकडे नवी जबाबदारी
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : शिंदे सरकारच्या स्थापनेला महिना लोटला, मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. पण आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त नक्की करण्यात आलाय. मंगळवारी म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. या विस्तारात भाजप आणि शिंदे गटातील एकूण 20 ते 25 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना फोन गेलाय आणि त्यांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ आता आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद दिल्यास, प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याकडे दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु होती. अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक आणि आशिष शेलार यांचं संघटन कौशल्य लक्षात घेत पक्षश्रेष्ठींनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शेलार यांच्याकडे देण्याचं निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे. आता पाटील यांचं नाव मंत्रिपदासाठी नक्की झाल्यामुळे शेलारांकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे.

राज्यात नव्या नेतृत्वाची उभारणी?

महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या देवेंद्र फडणवीस यांचा शब्द प्रमाण आहे. अशावेळी महाराष्ट्रात भाजपकडून नव्या नेतृत्वाची उभारणी केली जाऊ शकते. त्यामुळेच शेलार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तसंच शेलार यांचं संघटन कौशल्य भाजपसह विरोधकांनाही माहिती आहे. मुंबईत भाजपा मोठी करण्यात शेलार यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून शेलार यांच्या नेतृत्वाला चालना दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे.

भाजपचं लक्ष्य मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा मानस भाजप नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवला आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप अवघ्या 2 जागांनी शिवसेनेपासून दूर राहिली. त्यावेळीही सर्व जबाबदारी आशिष शेलार यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. त्यामुळे तोंडावर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलार यांना अधिक ताकद देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतल्याचं दिसत आहे.