काल राज ठाकरे-मुख्यमंत्र्यांची भेट, आज शेलार भेटीसाठी पोहोचले

| Updated on: Oct 16, 2022 | 10:56 AM

भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. वाचा...

काल राज ठाकरे-मुख्यमंत्र्यांची भेट, आज शेलार भेटीसाठी पोहोचले
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या राजकीय समीकरणं बदलत आहेत. शिंदेगट आणि भाजपने एकत्र येत सरकार स्थापन केलं. त्यानंतर आणखी काही राजकीय बदल होण्याचे संकेत आहेत. अशातच भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट (Ashish Shelar Meets Raj Thackeray) घेतली. शिवतीर्थ या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी जात त्यांनीही भेट घेतली.

शेलार म्हणाले…

राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. आज राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. यात राजकीय चर्चा झालेली नाही, असं शेलार म्हणालेत. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ही केवळ राजकीय चर्चा नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा पोटनिवडणुकीचं वारं वाहतंय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ही निवडणूक होतेय. ठाकरे आणि शिंदेगटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.दोन्ही बाजूने विजयावर दावा केला जातोय. या मतदार संघात ठाकरे गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप-शिंदेगट विशेष प्रयत्न करतंय. त्यातच मनसेचा पाठिंबा मिळाल्यास त्यांना या निवडणुकीत अधिकचं बळ मिळेल. त्यामुळे भाजपकडून राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.

काल मुख्यमंत्र्याची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तिथेही अंधेरी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.