मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी गोगलगायीसंदर्भात पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पाठवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे. (Ashish Shelar on Tejas Thackeray getting permission for Snail Research in Western Ghats)
“तेजस ठाकरे यांनी खेकडे, पालीनंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली. त्याला वन्य जीव मंडळाने मंजुरी दिली. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच! महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच!” अशा शब्दात शेलारांनी कौतुक केले आहे.
तेजस ठाकरे यांनी खेकडे,पाली नंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली त्याला वन्य जीव मंडळाने मंजूरी दिली. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच!
महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 9, 2020
पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी तेजस यांनी महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवला होता. या संदर्भात वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावाला मान्यता दिली. तेजस ठाकरे यांचा सात ऑगस्टला वाढदिवस होता. त्यामुळे प्रस्तावाला मिळालेली मान्यता हे त्यांच्यासाठी अनोखं गिफ्टच ठरलं आहे.
या अभ्यासासाठी तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्निल पवार आणि अमृत भोसले यांना उत्तर पश्चिम घाट संरक्षित वनामध्ये जमिनीवरील गोगलगाईचं संशोधन करण्याची परवानगी मिळाली आहे. जैवविविधता, खनिज संपत्ती यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचा अधिवास असलेला पश्चिम घाट हा आकर्षण केंद्र आहे. राज्य सरकारच्या वन्यजीव मंडळाची 15 वी बैठक शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
तेजस ठाकरे काय करतात?
वडील उद्धव ठाकरे आणि मोठे बंधू-मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे अद्याप सक्रीय राजकारणात उतरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेजस यांचे दर्शन घडले होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तेजस यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.
वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी वन्य जीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्या आहेत. यातील एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे नाव दिलं आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडीटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातीची नावं आहेत. यातील शेवटचं नाव हे ठाकरे या आडनावावरुन देण्यात आलं आहे.
तेजस ठाकरे यांनी महिन्याभरापूर्वीच पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे.
तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता. मात्र, गेली पाच वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींचे जनुकीय वेगळेपण आणि प्राणी शरीरशास्त्राच्या नियमानुसार सविस्तर संशोधन करण्यात आलं. या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ (Magnificent Dwarf Gecko) असं ठेवण्यात आलं आहे.
सप्टेंबर महिन्यात तेजस ठाकरेंनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ (Snake Boiga Thackeray) असं ठेवण्यात आलं होतं.
(Ashish Shelar on Tejas Thackeray getting permission for Snail Research in Western Ghats)