मुंबईः मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एवढी वर्ष शेठजी असल्याप्रमाणे वसुली केली. मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला, असा गंभीर आरोप भाजपने केलाय. भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज हा आरोप केला. शिवसेना नेते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. भाजप मुंबईला भिकेला लावणार आहे. भक्त आंधळे असतात, हे माहिती होतं. पण गुरूसुद्धा आंधळे असतात, हे माहिती नव्हतं. आम्ही बीएमसीला सक्षम बनवलं त्यानंतरच फिक्स डिपॉझिट तयार झालं, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, एक अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. स्वतःच्या कुटुंबातील बंधूंनाही एकत्र ठेवू शकले नाहीत. पक्षही एकत्र ठेवला नाही. गणेश नाईक ते नारायण राणे सगळेच त्यांच्यावर आरोप करून बाहेर पडले. सरकारही वाचवू शकले नाहीत. अशा अपयशी माणसाच्या बोलण्याला महत्त्व द्यायचं नाही, असं मुंबईकरांनी ठरवलंय, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय.
गेल्या 25 वर्षात केवळ रस्त्यावर या दरोडेखोरांनी २२ हजार कोटी रुपये खर्च केले. महापालिकेच्या अर्थसंकल्पावर एवढा मोठा दरोडा टाकला. शेठजीसारखं काम केलं. भाजपला मुंबईकरांनी संधी दिली तर आम्ही सेवक म्हणून काम करू, असं आश्वासन आशिष शेलार यांनी दिलंय.
उद्धव ठाकरे यांनी एवढी वर्ष शेठजींप्रमाणे काम केलं. महापालिकेच्या ठेवी ठेकेदारांना वाटल्या. ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. या शेठजी आणि ठेकेदारांपासून मुंबईची मुक्तता करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार.
उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेला वैचारिक स्वैराचार इतिहासात नोंदला जाईल असा आहे. वैचारिक स्वैराचाराचं नृत्य म्हणजे उद्धव ठाकरे यांचं राजकीय जीवन आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.