मुंबईः छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) धर्मवीर नव्हते, औरंगजेब (Aurangzeb) हा क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या (Nawab Malik) पक्षाच्या नेत्यांची ही विधानं महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी, ही एक औरंगजेबी चाल तर नाही ना, असा तिखट सवाल भाजपाकडून विचारण्यात आलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज शिवसेनेला इशारा देणारे ट्विट केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, स्वराज्य रक्षक होते, अजित पवारांच्या या वक्तव्यावरून भाजपने चौफेर टीका आणि आंदोलनं सुरु केली आहेत. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणीही केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून यावर टीप्पणी करण्यात आली आहे.
◆ काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला “टकमक टोकाकडे” घेऊन जात आहेत !
◆ आपल्या राजकीय स्वार्थासाठी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे.
3/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2023
संभाजी महाराजांच्या पित्याचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज राजभवनात ठाण मांडून बसले आहेत, त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात, हीच गंमत आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
यावरून आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची अशी वक्तव्ये खपवून घेणाऱ्या शिवसेनेचा ऱ्हास होईल. जनता एक दिवस या महाविकास आघाडीचा कडेलोट करेल, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलंय.
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचलाय? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलीय का? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून “अण्णाजी पंत” यांनी लिहीलेय का, असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवायला निघाली आहे, असे सूचक ट्विट आशिष शेलार यांनी केलंय. त्यामुळेच आजच्या सामनातून अजित पवारांची पाठराखण करण्यात आल्याचं शेलार यांनी म्हटलंय.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंबद्दल हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरु आहे. अजित पवार यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपकडून करण्यात येतेय. यासाठी काल राज्यभरात विविध जिल्ह्यात भाजपने आंदोलन केलं.
तर छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आधी राजीनामा घ्या, अशी भूमिका महाविकास आघाडीने लावून धरली आहे.