दिनेश दुखंडे, मुंबईः आशिष शेलार (Ashish Shelar) खोटं बोलतायत. बँड स्टँडच्या घटनेत मृत्यू झालेला कार्यकर्ता भाजपाचा (BJP) नव्हता, असा आरोप मुंबईच्या एका कुटुंबाने केलाय. मुंबईकरांना बदल हवाय. त्यांचं ठरलंय अशा टिप्पण्या करत भाजप यंदा मुंबई महापालिका (BMC) काबीज करण्याच्या तयारीत आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोशल मीडिया, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून शिवसेनेची कामं उघडी पाडण्याचा सपाटा लावलाय. याच मालिकेत त्यांनी काल दावा केला. बँड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना एका कार्यकर्त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. तो मृत्यूमुखी पडलेला दुर्दैवी कार्यकर्ता रमेश वाळूंज हा भाजपचा होता, असा दावा काल आशिष शेलार यांनी केलाय.
मुंबईकरांवर संकट येतं तेव्हा लोक कुठं असतात, या लोकांना आपल्याला आसमान दाखवायचंय, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलं. त्याला प्रत्युत्तरादाखल आशिष शेलार यांनी ट्विट केलं.
त्यात ते म्हणाले, ‘ 26 जुलैच्या पावसात मुंबईकर झटत होते. पण त्या दाहक आठवणींवर भाषण करणारे नेते आपल्या वडिलांना मातोश्रीत सोडून स्वतः पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते.
एवढंच नाही तर त्यापुढे त्यांनी लिहिलंय, ‘ बॅंड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात होत्या. तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचविताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपचा होता.
26 जुलैच्या पुरात मुंबईकरच मुंबईकरांसाठी झटत होते, हे खरे आहे.
पण आज त्या दाहक आठवणींचे भाषण करणारे
26 जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना मातोश्रीत सोडून स्वत: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते.. त्याचे काय?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2022
दरम्यान, रमेश वाळूंज यांच्याबाबत शेलार यांनी केलेला दावा खोटा असल्याचा दावा वाळूंज कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. यावर खुलासा करण्यासाठी वळंजू कुटुंब आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
वांद्रे पश्चिम येथील सेंट जॉन बटीस्टा रोडवरील डिमांड आर्च बिल्डिंगमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आशिष शेलारांना शिवसेना आणि वाळूंज कुटुंबीय माध्यमांसमोर उघडे पाडणार का, असा सवाल विचारला जातोय.