मुंबई: ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पक्षात कोण ऐकत नसल्यानं अशोक चव्हाण राजीनाम्याच्या मनस्थितीत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांची चंद्रपुरातल्या कार्यकर्त्यांसोबतची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. त्यावरुन अशोक चव्हाण अंतर्गत गटबाजीमुळे वैतागल्याचं दिसून येतं.
चंद्रपूरमध्ये काँग्रेसने लोकसभेसाठी विनायक बांगडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र बांगडे यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांजवळ नाराजी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांनी चव्हाण आणि वडेट्टीवार यांच्याशी केलेली संभाषण क्लिप वायरल झाली. दोघेही राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
ती ऑडियो क्लिप मी ऐकलेली नाही. जी कार्यकर्त्यांची भावना आहे तीच माझी भावना आहे. आमची जशी उमेदवारीबद्दल चर्चा होते, तशी उमेदवारी जाहीर केली जाते. त्या ऑडीओ क्लिपचा काही संबंध नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
अब्दुल सत्तार यांना उमेदवारी हवी असल्यास त्यांनी लोकसभा लढवावी. त्यांना कुठे पाहिजे तिथं उमेदवारी दिली असती. त्यांच्या उमेदवारीचा काही विषय नाही. अपक्ष लढायची काही गरज नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
रत्नागिरी सिंधुदुर्गात बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम आहे. त्यांच्या उमेदवारीवर काही वाद नाही. आम्ही विचारपूर्वक उमेदवारी दिली आहे. समाजाच्या कामासाठी ते स्टेजवर गेले होते, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.