नांदेड : “अशोकराव हे लीडर नाही, डीलर आहेत”, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केला. अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये आज भाजपची प्रचार सभा होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर टीका करत, त्यांनी मुख्यमंत्री होऊनही नांदेडचा विकास का केला नाही, असा सवाल केला.
लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपडून मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा घेतल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागो-जागी जाऊन सभा घेत आहेत. गुढीपाडव्याला आज नांदेड मतदारसंघात भाजपची मोठी सभा भरवण्यात आली आहे. येथे मुख्यमंत्र्यानी माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांना डीलर म्हणून संबोधलं.
“अशोक चव्हाण यांना इतक्यावेळा मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं. त्यांना इतक्या संधी दिल्या. मात्र, तरीही ते या नांदेडचा चेहरा बदलू शकलेले नाही. त्यांनी कुठल्याही पद्धतीने नांदेडचा विकास केला नाही. ते यासाठी विकास करु शकले नाही, कारण ते लीडर नाही तर डीलर आहेत. त्यांच्याकडे अनेक एजन्सी आहेत”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर केली. त्यामुळे गेल्यावेळी जरी थोडक्यात नांदेड हुकलं असेल, मात्र आता हुकू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नांदेडकरांना केलं.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. “आमच्या जवानांवर कुणी हल्ला केला, तर आम्ही त्यांच्या देशात घुसून त्यांचा खात्मा केला आणि काँग्रेस आता देशद्रोहाचा गुन्हा रद्द करायला निघाली आहे”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला लगावला. तसेच, “हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की, जैश-ए-मोहम्मदचा राजीनामा, हे मला आधी सांगा”, असे म्हणत राहुल गांधींचं भाषण हे काल्पनिक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात भाजपच्या कामाची पावती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मराठवाड्यात तेरा हजार कोटींची विकास कामं सुरू आहेत. तर, एकट्या नांदेड जिल्ह्यात आम्ही पाच हजार कोटींची विकास कामं करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.