नांदेडमधून अशोक चव्हाणच काँग्रेसचे उमेदवार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हेच नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अशोक चव्हाणांऐवजी पत्नी आमदार अमिता चव्हाण यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा होती. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर अशोक चव्हाण स्वत: लोकसभा निवडणूक लढण्याची चिन्हं आहेत. याआधी चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस झाली होती. मात्र काँग्रेसचे […]

नांदेडमधून अशोक चव्हाणच काँग्रेसचे उमेदवार?
Follow us on

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हेच नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अशोक चव्हाणांऐवजी पत्नी आमदार अमिता चव्हाण यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा होती. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर अशोक चव्हाण स्वत: लोकसभा निवडणूक लढण्याची चिन्हं आहेत.

याआधी चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस झाली होती. मात्र काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढणार नसल्यास, चुकीचा संदेश जाण्याची भीती हायकमांडला आहे. त्यामुळेच अशोक चव्हाण पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचं जवळपास निश्चित आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेतही नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे विजयी झाले होते. मोदींच्या विक्रमी सभेनंतरही भाजपला इथे मोठं अपयश आलं होतं. तब्बल 80 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत अशोक चव्हाण विजयी झाले होते. खरंतर त्यावेळेला स्थानिक नेतृत्व जोपासण्यासाठी लोकांनी चव्हाण यांना विजयी केलं.

नांदेड लोकसभेचा मतदारसंघ हा काँग्रेसचा मजबूत गड मानला जातो. गेल्या महिन्यात राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढवतील अशी एक चर्चा सुरु झाली होती. त्यातून काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे, हे कार्यकर्त्यांना दाखऊन द्यायचे होते. पण राहुल गांधींबाबतचे वृत निराधार होते, हे कालांतराने सिद्ध झाले. तर आता लोकसभेच मतदान एका महिन्यावर आल्याने मुद्दा असा आहे की नांदेड लोकसभा कॉंग्रेसकडून लढवणार तरी कोण?

नांदेड कॉंग्रेस कमीटीने सुरुवातीला अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, असा ठराव दिल्लीकडे पाठवला.  मात्र आता अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव चिखलीकरांचा सामना?

काँग्रेसकडून अमिता चव्हाण मैदानात आल्या तर भाजपा अशोक चव्हाण यांचे मेहुणे असलेल्या भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांना मैदानात उतरवणार अशी माहिती मिळतेय. भास्करराव पाटील खतगावकर यांची जिल्ह्यात चांगली पकड आहे. त्यामुळे असं झालं तर ही लढत रंगतदार होईल.

दुसरीकडे, नांदेडमधून पुन्हा अशोक चव्हाणच लोकसभेच्या रिंगणात असतील अशी शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून मुख्यमंत्र्यांचे मित्र असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांना भाजप रिंगणात उतरवू शकते. एकेकाळचे सहकारी असलेले अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर ही लढत राज्यात लक्षवेधी ठरेल. कारण इथ मैदानात प्रताप पाटील असले तरी त्यांच्या मागे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा राहणार आहे. आजी – माजी मुख्यमंत्र्यांची लढाई म्हणून ही निवडणूक ओळखल्या जाऊ शकते. भाजपा ने या दृष्टीने तयारी केल्याचेही सांगण्यात येतेय.

लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, नांदेडमध्ये भाजपतर्फे प्रताप पाटील चिखलीकर हे मैदानात असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि प्रताप पाटील यांच्या भेटीत ही उमेदवारी फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रताप पाटील यांच्या उमेदवारीमुळे त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत. तर काँग्रेसची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.

संबंधित बातम्या

भाजपकडून अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आमदार मैदानात?  

नांदेडच्या तीन आमदारांना खासदारकीचे डोहाळे    

नांदेड जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन?   

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, कार्यकर्ते संभ्रमात!