पुणे | 12 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या पक्षात मंत्री होते, आमदार होते ते निघून गेले. पण, पक्ष म्हणून काही परिणाम झाला नाही. एखाद्याचे पक्ष सोडून जाणे हे धक्कादायक असते. मात्र, त्याने पक्षावर काही परिणाम होतो, असे मला वाटत नाही. नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे नेते चौकशी खाली आहेत, त्यांना ते नाचवणार आहेत. वरिष्ठ नेते किंवा सेकंड फळीतील नेत्यांनाही मोदी नाचवणार आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात मीडियाशी संवाद साधला. ते पुण्यात भीमा कोरेगाव आयोगासमोर साक्ष देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. काल देशभरात साडेचारशे ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्या धाडी राजकीय नव्हत्या, तर अराजकीय होत्या. या धाडी टाकण्याचे कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते कितीही म्हणत असतील की, आम्ही चारशे प्लस जागा जिंकणार आहोत, पण ते भीतीपोटी आहे. भीती निर्माण व्हावी म्हणून ते राजकीय आणि अराजकीय (व्यापारी) यांच्यावर देखील धाडी टाकत आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.
भाजप ही भयग्रस्त झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार करून लोकांनाही भयग्रस्त करून आपल्याला जिंकता येतंय का? अशी त्यांची खेळी आहे. म्हणून राजकीय नेते, व्यापारी यांच्यावर धाडी सुरू झाल्या आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांना असे विचारतो की, तुम्हाला हे अपेक्षित आहे का? भीती निर्माण करण्यासाठी धाडी हे यंत्र भाजप वापरत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. महाराष्ट्र कधीही इतका वादग्रस्त नव्हता. या ठिकाणी स्टेबल सरकार चालत होतं. सध्या पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकावणं हे फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे मराठी माणसाच्या मानसीकतेला झेपणारं नाही. तो त्याच्याशी सहमत नाही. त्यामुळे तो इलेक्शनची वाट पाहत आहे, असेही ते म्हणाले.
भीमा कोरेगाव दंगल पोलिसांनी घडवली आहे. आयोगासमोर हा विषय वळवण्याचा प्रयत्न होत होता आणि ते माझ्या तोंडून वदवून घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून मी आयोगाला म्हटलं की, मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिली आहे. आता मी थांबतो, असं आंबेडकर म्हणाले.