हिंगोलीः महाराष्ट्रातले बडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यात कितपत तथ्य आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, अशोक चव्हाण हे तर महाराष्ट्रात काँग्रेसचे एक नंबरचे नेते आहेत. ते असा विचार करूच शकणार नाहीत. विरोधक त्यांच्याविषयी अपप्रचार करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतीच भारत जोडो यात्रेला आजपासून सुरुवात करत आहेत. ही यात्रा लवकर हिंगोलीत येणार आहे. यानिमित्त आज माणिकराव ठाकरे प्रशिक्षण आणि संबोधनासाठी आज हिंगोलीत आले होते.
अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांवर माणिकराव ठाकरे म्हणाले, ‘ काल परवाच आमची भेट झाली. दिल्लीच्या एका सभेत काँग्रेसच्या फक्त 10 लोकांना बोलण्याची संधी होती. त्यात अशोक चव्हाणांचा नंबर होता. असं हे महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे.
आज राज्यातील काँग्रेसचे ते एक नंबरचे नेतृत्व आहे. दोन वेळा मुख्यमंत्री होते. प्रांताध्यक्ष होते. अशा प्रकारचा विचार ते करूच शकत नाहीत. या बातम्या विरोधी पक्षांकडून पसरवल्या जात आहेत. हा त्यांच्याविरोधातला अपप्रचार आहे, असं वक्तव्य माणिकराव ठाकरे यांनी केलं.
Congress | अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार? माणिकराव ठाकरे म्हणतात, ते तर… pic.twitter.com/6SuQsWLhxI
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2022
आज भाजपचं जे सरकार जनहिताचं नाही. संविधानाविरोधात आहे. संविधानानं दिलेले स्वातंत्र्याचे अधिकार संपुष्टात आणणारं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार बाजूला सारलंच पाहिजे, अशी भूमिका जनतेची आहे, असं वक्तव्य माणिकराव ठाकरे यांनी केलं.
मिशन 2024 लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा असेल. 150 दिवसांच्या यात्रेत राहुल गांधी 12 राज्यांना भेटी देतील. हे 3570 किमी अंतर असेल.
भारत जोडो यात्रेअंतर्गत राहुल गांधींच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार आहेत. त्यापैकी एक बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव/जामोद तर नांदेडमध्ये एक सभा होईल, असा अंदाज माणिकराव ठाकरे यांनी वर्तवला आहे.