अशोक गहलोतांनी विश्वास गमावला? पुन्हा काँग्रेस अध्यक्ष पदाचा शोध, पर्याय कोण?

| Updated on: Sep 27, 2022 | 2:19 PM

काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं तरी राजस्थानच्या विधीमंडळावरील वर्चस्व न सोडण्याचा हट्ट गहलोत यांना भोवण्याची चिन्ह आहेत.

अशोक गहलोतांनी विश्वास गमावला? पुन्हा काँग्रेस अध्यक्ष पदाचा शोध, पर्याय कोण?
अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची (Congress President) माळ गळ्यात पडत असतानाही राजस्थान (Rajasthan) विधीमंडळावर आपलंच वर्चस्व असावं, हा हट्ट आता मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांना भोवण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ पातळीवरील सर्वच नेते हा तिढा सोडवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत आहेत. राजस्थान काँग्रेसमध्ये गहलोत यांच्या आमदारांनी अडवणुकीची भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे पर्यवेक्षक मल्लिकार्जून खरगे आणि अजय माकन यांनी राज्यातील काँग्रेसमधील गुंत्याचा लिखित रिपोर्ट पक्षध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रिपोर्टच्या आधारे शिस्तभंग केल्या प्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या समर्थक आमदारांविरोधात कारवाई केली जावी, असे काही नेत्यांचे मत आहे.

गहलोत समर्थक आमदारांवर कारवाई झाली तर काँग्रेस अध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून अशोक गहलोत यांचं नाव बाहेर जाईल. त्यामुळे यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण, हा प्रश्न मोठा होईल.

अध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून गहलोत बाहेर पडले तर दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, मल्लिकार्जून खरगे आणि कमलनाथ यांची नावं स्पर्धेत आहेत. या नावांपैकी एकाचा विचार होऊ शकतो.

सध्या काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेवर आहेत. इकडे राजस्थान काँग्रेसमध्ये घमासान सुरुआहे.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक प्रलंबित आहे. या प्रक्रियेत नामांकन प्रक्रियेसाठी आता फक्त चार दिवस उरलेत.

काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता जाणणाऱ्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आता अध्यक्षपदाच्या स्पर्धेबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इतर नावांवर आता चर्चा सुरु झाली आहे.

राजस्थान काँग्रेसमधील गटबाजीमुळे एकूणच अशोक गहलोत यांची प्रतिमा डागाळली आहे. त्यांनी विश्वसनीयता गमावल्याची चर्चा आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या एका वृत्तानुसार, अशोक दहलोत आता काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार नसतील. असले तरीही गांधी परिवाराकडून त्यांना समर्थन मिळणार नाही.

काँग्रेसचा पुढील अध्यक्ष उत्तर भारतातूनच असावा, यासाठी पक्षाचा आग्रह असू शकतो. कारण भाजपा आणि काँग्रेससाठी तेच खरे युद्धाचे मैदान आहे.

दक्षिण भारतात काँग्रेसच्या नेत्यांची पकड आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. केसी वेणुगोपाल केरळचेच आहेत. मल्लिकार्जून खरगे कर्नाटकात विरोधी पक्षात आहे. त्यामुळे शशी थरूर यांनाही फार समर्थन मिळणार नाही, असे म्हटले जात आहे.