Congress Assembly Election 2024 : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजप, मनसेपाठोपाठ आता काँग्रेस पक्षाकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता काँग्रेसने महाविकासआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही जागांवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. सध्या काँग्रेसकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. मुंबई काँग्रेसकडून मुंबईतील सर्वच 36 मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व निरीक्षक या मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. हे निरीक्षक संपूर्ण मतदारसंघ फिरुन कोणत्या पक्षाचं स्थान बळकट आहे, कोणत्या उमेदवाराला पसंती आहे याचा आढावा घेणार आहेत. हा आढावा घेतल्यानंतर त्याचा संपूर्ण अहवाल तयार केला जाईल. यानंतर तो वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल, धारावी, भायखळा, वडाळा, अणुशक्ती नगर, चांदिवली या काही मतदारसघांवर काँग्रेस दावा करणार असल्याचे बोललं जात आहे. यातील काही मतदारसंघ हे ठाकरे गटाच्या वाट्याला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही महाविकासआघाडीमध्ये जागावाटपाची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी वाटघाटी करुन अंतिम जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने समितीची स्थापन केली आहे. यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सात तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे तीन असे एकूण दहा सदस्य आहेत.
काँग्रेसने जागा वाटपासाठीच्या वाटाघाटीसाठी नेमलेल्या समितीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी मंत्री सतेज पाटील यांचा समावेश आहे. तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीमधून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री असलम शेख यांचा समावेश आहे.