Chief Minister Post Dispute : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सर्वच पक्ष कोणकोणत्या जागांवरुन विधानसभा निवडणूक लढवायची याची चाचपणी घेत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्येही मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण पाहायला मिळत आहे. सध्या महाविकासआघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन धुसफूस सुरु आहे. यावरुन आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठे विधान केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे महाविकासआघाडीचा चेहरा आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाहीच, असे विधान केले होते. यानंतर नाना पटोलेंनी जर शरद पवार किंवा स्वत: उद्धव ठाकरेंनी केले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ. अन्यथा आम्हाला याबद्दल विचार करण्याची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे बोललं जात आहे.
आता मुख्यमंत्रिपदाच्या या वादात राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. आम्ही चेहऱ्यात अडकत नाही. आम्हाला महाविकासआघाडी म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. त्यामुळे पदामध्ये आम्ही अडकत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकसभेतही आम्ही म्हणजेच शरद पवारांनी सर्वात कमी जागा घेतल्या होत्या. कारण आम्हाला आघाडी आणि मायबाप जनतेची सेवा करण्यामध्ये रस आहे. संजय राऊत आणि पृथ्वीराज चव्हाण यांसह प्रत्येकाला वाटत असतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. महाराष्ट्रात आता इतके पक्ष झालेले आहेत, त्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा जर तुम्ही सर्व्हे घेतला तर प्रत्येकजण तुम्हाला आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे सांगितले. जरी एक आमदार निवडून आलेला असेल तरीही कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपला माणूस मुख्यमंत्रिपदी व्हावा. यात काहीही गैर नाही, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले.
दरम्यान संजय राऊत यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर नुकतंच भाष्य केले. महाविकासआघाडीचाच मुख्यमंत्री होईल, हे त्यांचे वाक्य बरोबर आहे. पण त्यांच्यासमोर जर काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदासाठीचा वेगळा चेहरा असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगावे. माझी यात काहीही अडचण नाही. काँग्रेसमध्ये जर मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा असेल आणि त्यांनी जर तो सांगितला तर आम्ही त्या चेहऱ्याचे नक्कीच स्वागत करु. नाना पटोले हे आमचे मित्र आहेत. त्यांची अडचण मी समजू शकतो. इतरांचीही अडचण मी समजू शकतो, असे संजय राऊत म्हणाले.