चंद्रपूर : काँग्रेसचे चंद्रपूरचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या अडचणी वाढणार आहेत. चंद्रपूर लोकसभेची निवडणूक दारूच्या पेल्याभोवती फिरत असल्याचं स्पष्ट झालंय. चंद्रपूर आणि यवतमाळच्या दारूबंदी आंदोलकांनी आमचा खासदार दारू विक्रेता नसावा, अशी ठाम भूमिका घेतली आहे. चंद्रपुरात आंदोलकांनी भाजपला जाहीर पाठींबा देत असल्याचे स्पष्ट केले असून उत्तरादाखल भाजप उमेदवार स्वतः कोळसा तस्कर असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दारू निर्मात्या आहेत हे काँग्रेसने लक्षात आणून दिले आहे.
काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांचा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. काँग्रेसने एका दारू विक्रेत्याला उमेदवारी दिल्याने चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदी आंदोलक कमालीचे संतापले आहेत. तब्बल 10 दिवसाच्या मंथनानंतर श्रमिक एल्गार, तुकडोजी महाराज दारूमुक्ती आंदोलन, स्वामींनी दारूमुक्ती अभियान या संघटनांनी सर्व पक्षांच्या भूमिका जाणून घेत थेट भाजपला पाठींबा दिला. आमचा खासदार दारू विक्रेता नसावा अशी भूमिका या संघटनानी मांडली आहे. चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या दारूबंदी असलेल्या तीन जिल्ह्यासंदर्भात कायदे अधिक कडक करणे आणि यवतमाळच्या दारूबंदी संदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने ही भूमिका घेतली असल्याचं आंदोलक नेत्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दारूविक्री हा आपला वैध व्यवसाय आहे. माझे केवळ एक दुकान आहे. मात्र भाजपच्या प्रचारासाठी या क्षेत्रात येत असलेल्या मंत्री पंकजा मुंडे दारू निर्मात्या आहेत, मग पारोमिता गोस्वामी काय भूमिका घेतील असा सवाल चंद्रपूर लोकसभेचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी विचारला आहे. या भागात दारूबंदी असली तरी भाजपचे कार्यकर्तेच अवैध दारू विक्री करत आहेत. स्वतः उमेदवार हंसराज अहिर कोळसा तस्कर असल्याचा गंभीर आरोप धानोरकर यांनी निवडणुकीच्या गदारोळात केला.
चंद्रपूर लोकसभेत दारूबंदी हा लोकसभा प्रचाराचा मुद्दा होणार हे गृहीतच होते. मात्र ज्या दारूबंदी आंदोलनाने दोन सरकारला सळो की पळो करून सोडले ते आंदोलन भाजपला थेट पाठींबा दिल्याने राजकीय शरण झाले की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.