कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा रंगतदार किस्सा रत्नागिरी जिल्ह्यातून समोर आलाय. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड (Astana Gram Panchayat Election Results) तालुक्यात एका ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election Results 2022) शिंदे गटाचा उमेदवार आश्चर्यकारकरीत्या अवघ्या एका मताने विजयी झाला. मात्र शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विजयावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराने तर आक्षेप नोंदवलाच. शिवाय भाजपनेही या विजयावरुन सवाल उपस्थित केलेत. विजयाचा पेंढा तोंडापर्यंत येता येता कसा काय राहिला, यावरुन पराभूत उमेदवारांनी शंका घेतलीय.
रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यामध्ये पाच ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात झाली. खेड तालुक्यात असलेल्या अस्तान या अत्यंत प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतीत अवघ्या एका मताने बाळासाहेबांची शिवसेना, या शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला. मात्र भाजप आणि मविआ पदाधिकाऱ्यांना या विजयावर शंका घेतली.
भाजप आणि मविआच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशिनवर आक्षेप घेतला. मतदानाची तारीख 16 असताना 15 तारखेला मतदान झाल्याची तारीख मशीन दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे मतदान पुन्हा घ्यावं अशी मागणी त्यांनी केली.
दोपोली विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खेड तालुक्यात अस्तान ही एक महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. अवघ्या एका मताने अस्तान गावातील शिंदे गटाचा उमेदवार निवडणूक आल्यामुळे या निकालाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.
16 ऑक्टोबर 2022 रोजी अस्तान ग्रामपंचायतीत मतदान पार पडलं होतं. एकूण तीन प्रभागात मतदान झालं होतं. मात्र तीनपैकी एका प्रभागात झालेल्या मतदानामध्ये 16 ऐवजी 15 ऑक्टोबर तारीख कशी काय? असा सवाल प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उपस्थित केलाय. फेरनिवडणूक जर घेतली नाही, तर आम्ही आमरण उपोषण करु, असा इशाराही देण्यात आलाय.