चंदन पूजाधिकारी, नाशिकः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिर्डी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिर्डीत साईबाबांचं (Shirdi Saibaba) दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिन्नर तालुक्यातील इशानेश्वर मंदिरात गेले. तेथे अंकशास्त्राचे अभ्यासक अशोक खरात (Ashok Kharat) यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर आपले भविष्य जाणून घेतले, अशी चर्चा रंगतेय. इशानेश्वर मंदिराचे फोटो तर आहेत. पण भविष्य जाणून घेतले की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. घटनात्मक पदावरील व्यक्तीने भविष्य जाणून घेण्यासारख्या घटनांवर विश्वास कसा ठेवायचा, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर सिन्नर येथील ज्योतिषी अशोक खरात यांनीच स्पष्टीकरण दिलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ ईशानेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. ते भविष्य जाणून घेण्यासाठी आले नव्हते, असा खुलासा अशोक खरात यांनी केलाय. नाशिकच्या टीव्ही 9 प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत यावेळी त्यांच्या पत्नी तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील होते. दीपक केसरकरांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
केसरकर म्हणाले, मी साईबाबांचा भक्त आहे. त्या भागात माझे एक मित्र आहेत. कॅप्टन खरात. त्यांचं इशानेश्वर मंदिर आहे. शिंदे साहेबांनी तिथे गोशाळेसाठी देणगी दिली होती…
शिंदे साहेबांनी गोशाळेचं काम सुरु होण्याआधी भेट द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. कॅप्टन खरात यांचं प्रोफेशन भविष्य सांगण्याचं आहे. पण शिंदे यांना भविष्य जाणून घ्यायचं असेल तर ते तिथे का जातील? त्यांनी खरात यांना मुंबईत बोलावून घेतलं असतं… असा खुलासा दीपक केसरकर यांनी केलाय.
प्रत्येकाला पर्सनल आयुष्य असतं. खरात हे शिवभक्त आहेत. त्यांनी गोशाळा बांधण्याचं काम हाती घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तिथे मदत केली. त्याची वाच्यताही त्यांनी केली नाही, उलट शिंदे यांचं कौतुक व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिष्याकडे भविष्य पाहिल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तीने असं वर्तन करणं चुकीचं असल्याचं मत यावेळी मांडण्यात आलंय.