औरंगाबाद : (Political differences) राजकीय मतभेद हे किती टोकाचे असून शकतात याचा प्रत्यय (Aurangabad) औरंगाबादेतील एका कार्यक्रमातून समोर आले आहे. गणरायाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे जागोजागी पोलिस प्रशासनाकडून समन्वय बैठकीचे आयोजन केले जाते. मात्र, शांतता राहण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच वातावरण कसे चिघळले याचे दर्शन घडले आहे. बैठकीच्या सुरवातीला आयोजकांकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मात्र, पहिला मान शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनाच का यावरुन शिंदे गटाचे (Sanjay Sirsath) आमदार संजय शिरसाट हे थेट व्यासपीठ सोडून मार्गस्थ होऊ लागले होते. परंतू, त्यांची समजूत खा. जलील यांनी काढली आणि शिरसाट हे शांत झाले. मात्र, कधीकाळी एका पक्षात असलेल्या खैरे आणि शिरसाट यांच्यात मध्यस्ती म्हणून जलील सहभाग नोंदवत असतील तर राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही..! अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
गणेश उत्सवाच्या अनुशंगाने पोलिस प्रशासनाकडून समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सर्वपक्षीय नेते हे व्यासपीठावर उपस्थित होते. लक्ष वेधले ते शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्या उपस्थितीने. कार्यक्रमाला सुरवात होताच, आयोजकांकडून उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभाला सुरवात झाली. पोलिस प्रशासनातील एका अधिकाऱ्याने थेट चंद्रकांत खैरे यांचाच पहिल्यांदा सत्कार केला. पण हे प्रोटोकॉलनुसार नाही असे म्हणत शिरसाट हे चांगलेच नाराज झाले. एवढेच नाहीतर ते व्यासपीठ सोडून निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यादवळ बसलेले जलील यांनी त्यांना रोखले व स्थानपन्न होण्यास सांगितले.
शिंदे गट आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोप हे काही आता नवे राहिलेले नाही. पण दोन्ही गटाचे नेते एकाच व्यासपीठावर आल्यावरही काय होऊ शकते याचा प्रत्यय आला आहे. आतापर्यंत शिवसेनेचे नेत चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदारांवर टोकाची टीका केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही कायम आक्रमक राहिलेला आहे. असे असताना दोन राजकीय विरोधक नेते एकत्र आले तरी त्यांच्यामध्ये राजकरण विरहीत संवाद महाराष्ट्राने अनेकवेळा पाहिलेला आहे. पण शिवसेना आणि शिंदे गटातील मतभेद किती ताणले गेले आहेत हेच यामधून समोर आले आहे. केवळ प्रोटोकॉलनुसार सत्कार न केल्याने शिरसाट हे चक्क कार्यक्रम सोडून निघाले होते.
औरंगाबाद येथे सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या माध्यमातून शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळे एमआयएमचे खा. जलील, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे उपस्थित होते. सत्कारावरुन शिरसाट चिडले असल्याचे फोटोतून स्पष्ट तर होत आहे. पण त्यांच्या या वागण्याची चर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही रंगली होती. अखेर शिंदे आणि शिवसेना वातावरण शांत रहावे म्हणून एमआयएमला मध्यस्ती करावी लागली हे विशेष.