पुणे : एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर मंगळवारी हल्ला करण्यात आला. पुण्यातील कात्रज परिसरात हा हल्ला झाला आहे. यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटलीय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची कात्रजमध्ये सभा होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सभेसाठी गोळा झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याच्या मागे सामंत यांची गाडी होती. सिग्नल लागल्यामुळे त्यांची गाडी सिग्नलवर थांबली असता, अचानकपणे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल आणि माध्यमांच्या कॅमेरात कैद झालाय. मात्र, हा हल्ला पूर्वनियोजित (Pre-planed Attack) आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा गंभीर आरोप उदय सामंत यांनी केलाय. हल्ल्या प्रकरणात कोथरुड पोलीस ठाण्यात सामंत यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सामंत म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे काहीजण सांगत आहेत की त्यांनी माझा ताफा अडवला. ते धादांत खोटं आहे. माझी गाडी सिग्नलला थांबली होती. मी कुठेही घाई न करता मी तिथे थांबलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यातून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हाता. बेस बॉलची स्टिक होती, एकाच्या हातात दगड बांधलेला होता. मला ते समोर येऊन शिव्या घालत होते आणि दुसऱ्या बाजूला एक 50 – 60 जणांचा मॉब होता. डाव्या बाजूला एसपीओ माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो होते. त्याबाजूला दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होत, त्यांच्या हातात सळईसारखं काही होतं, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी हा प्रकार केला ते दुसऱ्या लोकांना शुटिंग करा म्हणून सांगत होते. त्यांनी शिवीगाळ करुन, गाडीवर चढून मला मारण्याचा प्रयत्न केला. मला आताच कळालं की काही चॅनेलवर बोलताना शिवसेनेचे काही नेते म्हणाले की मला याचा अभिमान आहे. जर अशी हत्यारं घेऊन मुलं एका लोकप्रतिनिधीवर हल्ला करत असतील आणि त्याचा काहींना अभिमान वाटत असेल तर महाराष्ट्रातील राजकारण कुठच्या थराला जातंय, हे आज जनतेला दिसत आहे, अशी खंतही सामंत यांनी बोलून दाखवली.
असा भ्याड हल्ला करुन कुणाला वाटत असेल की मी शिंदे साहेबांची साथ सोडेन, आमचे 45 लोक शिंदे साहेबांची साथ सोडतील, तर आज या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो आहोत. असे भ्याड हल्ले करुन उदय सामंत थांबणारा नाही. कुठल्याही प्रसंगाला समोरा जाणारा आहे. कुणावर टीका करत नाही, त्याचा अर्थ मी हतबल नाही. आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशाराच सामंत यांनी हल्लेखोरांना दिलाय.