दत्ता कनवटे, औरंगाबादः युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यात झालेल्या दगडफेकीमुळे (Stone Pelting) शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. आदित्य ठाकरेंच्या दिशेने आलेले दगड जणू कुणीतरी त्या लोकांच्या हातात आणून दिले होते, हाच संशय असल्याचं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. दानवे यांनी यासंदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत गाफीलपणा केल्याचा ठपका अंबादास दानवे यांनी ठेवला आहे. आता गृहखात्याकडून यासदर्भात पुढील कारवाई काय केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज या प्रकरणावरून दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.
शिवसेनेचे आमदार व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगावात काल शिवसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच वेळी रमाबाईंची मिरवणूकदेखील होती. या दोन्ही ठिकाणच्या गर्दीमुळे गोंधळ निर्माण झाला. मिरवणुकीतील डीजेचा आवाज कमी करायला सांगण्यात आला. त्यामुळे मिरवणूक थांबली आणि दोन गटांमध्ये वादावादी झाली. याच वेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचंही समोर आलं.
Maharashtra | Stones were pelted at the convoy of Shiv Sena (Uddhav Thackeray faction) leader Aaditya Thackeray in Aurangabd’s Vaijapur area during party’s Shiv Sanvaad Yatra. pic.twitter.com/QVHefWf9IU
— ANI (@ANI) February 8, 2023
वैजापूर तालुक्यातील महालतगावात सभा सुरु असतानाही एक दगड मंचावर आला. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या दिशेनेही दगडफेक झाली. ज्या समूहाने दगडफेक केली, ते स्थानिक वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. दलित आणि हिंदू समाजात भांडण लावण्याचा प्रकार या समूहाने केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र पाठवलं आहे. एसपी, आयजींशी बोलले स्थानिक पोलिसांवर ते कारवाई करतील, अशी अपेक्षा असल्याचं दानवे म्हणाले.
ते म्हणाले, शिवशक्ती आणि भीमशक्तीत भांडणं लावून देण्याचा हा प्रकार आहे. यात मी कुणाला दोष देणार नाही. मात्र पोलिसांच्या बंदोबस्ताला एकही जबाबदार अधिकारी तिथे नव्हता. जी आयपीएस महिला होती, तिला यातलं कोणतंही ज्ञान नव्हतं….
दगडफेक करणाऱ्या लोकांना जणू त्यांच्या हातात दगड मिळाले होते की काय, असा संशय मनात येतो, तशी परिस्थिती तिथे होती, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. राजकीय गांभीर्य पाहता पोलिसांच्या कामात गाफिलपणा झाल्याचा आरोप दानवे यांनी केलाय.
वैजापुरात झालेल्या दगडफेकीवेळी जमलेला मॉब बोरनारे यांच्या विजयाच्या घोषणा देत होता. त्यामुळे या मागे बोरनारेंचा हात आहे का, असे विचारल्यास अंबादास दानवे म्हणाले, बोरनारेंना आम्ही जाणतो. दगडफेक करण्याएवढी त्यांची शक्ती नाही. परंतु त्यांना मानणारे काही जण आहेत, त्यांनीच हा प्रकार केल्याचा संशय अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय.