आधी खासदारकी गेली, शिवसेना आता औरंगाबादचं पालकमंत्रीपदही गमावणार?

| Updated on: Jun 20, 2019 | 4:14 PM

सध्या शिवसेनेकडे हे पालकमंत्रीपद असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादचे पालकमंत्री आहेत. सुरुवातीला औरंगाबादचं पालकमंत्रीपद पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे देण्यात आलं होतं.

आधी खासदारकी गेली, शिवसेना आता औरंगाबादचं पालकमंत्रीपदही गमावणार?
Follow us on

औरंगाबाद : भाजप आणि शिवसेना यांच्यात औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहराचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात यावं, अशी मागणी आता स्थानिक भाजपकडून करण्यात आली आहे. सध्या शिवसेनेकडे हे पालकमंत्रीपद असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादचे पालकमंत्री आहेत.

सुरुवातीला औरंगाबादचं पालकमंत्रीपद पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे देण्यात आलं होतं. पण तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत त्यांचे अंतर्गत वाद असल्याचं समोर आलं आणि त्यांची रवानगी करण्यात आली. यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकत्व देण्यात आलं, पण त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली.

अतुल सावे हे शहरातील आमदार आहेत. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे पालकमंत्रीपद भाजपला मिळावं, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे. यावर शिवसेनेची प्रतिक्रिया अजून समजू शकलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवाचं खापर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवरच फोडण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा युतीमध्ये धुसफूस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत अतुल सावे?

अतुल सावे हे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी 2014 ला राजेंद्र दर्डांचा पराभव केला होता. त्यांना नुकतीच उद्योग आणि खाणकाम, अल्पसंख्याक विकास व वक्फ या खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय. अतुल सावेंचे वडील मोरेश्वर सावे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे पहिले खासदार होते. सावे कुटुंबीय शिवसेनेतून भाजपात आलं होतं. भाजपात अतुल सावेंना जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्यत्व देण्यात आलं.

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेसह जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व आहे. पण या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. एमआयएमने शिवसेनेसमोर कडवं आव्हान निर्माण केलं आहे. त्यातच मित्रपक्ष भाजपकडून आता सध्या हातात असलेल्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात आलाय.