औरंगाबाद : काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar vs BJP Sillod) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण, भाजप कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळण्यास विरोध केलाय. अब्दुल सत्तार (Abdul Sattar vs BJP Sillod) यांच्या निषेधार्थ 270 स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. भाजपच्या विचारांचा उमेदवार उभा करण्याच्या भाजप बंडखोरांच्या हालचालीही सध्या सुरु आहेत.
अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसविरोधात बंड पुकारलं होतं. यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि आमदारकीचा राजीनामाही दिला. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. पण स्थानिक विरोधामुळे अब्दुल सत्तार यांना शिवसेनेत प्रवेश करावा लागला. शिवसेनेकडून त्यांना एबी फॉर्मही मिळाला असून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोण आहेत अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.
गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली.
सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.
गेली अनेक वर्ष आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलं. सुरुवातीला विलासराव देशमुख आणि त्यानंतर अशोक चव्हाण आणि शेवटी शेवटी राधाकृष्ण विखे पाटील समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश मिळवून स्वतःची मंत्रिपदी वर्णी लावली. पण अब्दुल सत्तार मात्र भाजपच्या दारावर ताटकळत राहिले.
भाजपऐवजी शिवसेनेत गेल्यामुळे आश्चर्य
सुरुवातीला अब्दुल सत्तार यांचा भाजपात प्रवेश करण्यासाठी जास्त आग्रह होता, यासाठी त्यांनी दोन वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक वेळा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. पण सिल्लोड मतदारसंघातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला कडवा विरोध केला. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना थेट हाताला धरून यात्रेच्या रथावर खेचून घेतलं, त्यावेळी अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश नक्की मानला जात होता. मात्र या घटनेनंतर चारच दिवसात अब्दुल सत्तार यांनी शिवसेना प्रवेश केला.