औरंगाबाद शहर, तालुका अन् जिल्ह्याचं नाव बदललं… आता सबकुछ छत्रपती संभाजीनगर!! प्रशासन विभागाचं राजपत्र जारी….

| Updated on: Feb 25, 2023 | 12:19 PM

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली होती.

औरंगाबाद शहर, तालुका अन् जिल्ह्याचं नाव बदललं... आता सबकुछ छत्रपती संभाजीनगर!! प्रशासन विभागाचं राजपत्र जारी....
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे,  औरंगाबाद : औरंगाबाद शहराचंच नव्हे तर आता जिल्ह्याचंही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने यासंबंधीचं राजपत्र नुकतंच जारी करण्यात आलंय. काल शहराचं नाव बदलण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली. त्यानंतर विरोधकांनी भाजप तसेच शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. केवळ शहराचं नाव बदलून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली होती. हिंमत असेल तर संपूर्ण जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करून दाखवा, असं आव्हान देण्यात आलं होतं. त्याला देवेंद्र फडवणीस यांनी उत्तरही दिलं होतं.

काल कोणता निर्णय?

केंद्र सरकारच्या वतीने काल उस्मानाबाद आणि औरंगाबाद शहराचं नाव अनुक्रम धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर असं करण्यास मंजूरी देण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात राज्य विधीमंडळाने यास मान्यता दिलेली असताना शिंदे-फडणवीस सरकार श्रेय लाटत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या वतीने जारी केलेल्या पत्रात फक्त शहराचं नाव बदलल्याचा उल्लेख आहे. जिल्ह्याचं नाव कधी बदलणार, यावरून देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आले.

अंबादास दानवे, खैरेंचा सवाल

अंबादास दानवे यांनी काल यासंदर्भातील ट्विट केलं होतं. फक्त शहराचंच नाव बदललंय की संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याचंही नाव बदललंय, हे केंद्र सरकारने स्पष्ट करावं. औरंगजेबाचं नाव मिटवायचं असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. ता. छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद… असे यापुढे लिहावे लागेल का, हे पण सांगा, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता…

अर्धवट काहीच ठेवत नाहीत…

अंबादास दानवे यांच्या ट्विटला फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.
त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!