औरंगाबादः आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) आधी दौरे केले असते तर आमदार भेटले असते. मग ही वेळ आली नसती. आम्ही मातोश्रीविरोधात कधीही बोलत नाहीत. पण वाचाळवीरांना समज दिली पाहिजे, असं वक्तव्य औरंगाबादचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा महत्त्वाचा गड मानला जातो. मात्र याच जिल्ह्यातून पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केल्यामुळे येथील शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे राज्यभरात दौरे आयोजित करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा 22 आणि 23 जुलै रोजी औरंगाबादेत दौरा झाला. विशेष म्हणजे ज्या आमदारांनी शिंदेंच्या गटात प्रवेश केला, त्याच आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे दौरे आयोजित कऱण्यात आले आहेत. आज पैठण आणि गंगापूरमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा होता. मात्र ठाकरे कुटुंबियांनी आधीच अशा प्रकारे शिवसैनिकांशी संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरेंना उद्देशून बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ आदित्य ठाकरेजी, थोडे आधी दौरे केले असते, आमदार भेटले सते. मग शिवसेनेवर ही वेळ आली नसती. आम्ही मातोश्री विरोधात बोलत नाहीत. पण वाचाळवीरांना वेळीच समज दिली पाहिजे. संजय राऊत ठाकरे कुटुंबाबद्दल काय बोलले बाहेर आल्यावर कळेल. जे आम्हाला गाढव बोलले ते राऊत स्वतःच गाढव आहेत… असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. आम्ही भाजप नेत्यांनी, फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयानंतर मनावर दगड ठेवत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री केलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेत्यांमध्ये अजूनही खदखद कायम असल्याचं बोललं जात आहे. यावर एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘ चंद्रकांत दादा बोलले ते त्यांच्या मनातील बोलले. भाजप कार्यकर्त्यांना वाटतही असेल. पण हा निर्णय चंद्रकांत दादा ,फडणवीस किंवा शिंदे घेतला नाही. पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेतला. त्यांना वाटतंय यात गैर नाही…यामुळे काहीही अडचण येणार नाही, मतभेद होणार नाहीत…
शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रभरात दौऱ्यावर आहेत. पुढील आठवड्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेदेखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटातर्फे राज्यभरात मेळावे आयोजित केले जात आहेत. अशा स्थितीत एकनाथ शिंदे गटाविरोधात वातावरणनिर्मिती होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. आठवड्यातील 4 दिवस मंत्रालयात काम तर तीन दिवस महाराष्ट्रात शिंदे यांचे दौरे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.