औरंगाबादः पालकमंत्री होताच संदिपान भूमरे (Snadipan Bhumre) यांनी औरंगाबादसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या 12 महिन्यात शहराचा पाणीप्रश्न (water issue) सोडवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. वर्षभराच्या आत शहराला दररोज पाणीपुरवठा करणार असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) कामकाजावरही टीका केली. मागील अडीच वर्षात यांनी काय केलं? ते मातोश्रीच्या बाहेरही निघाले नाहीत, असं वक्तव्य भूमरे यांनी केली.
शहरात सगळ्यात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे. त्यामुळे वर्षभरात मी या शहराला पाणी आणणार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.
औरंगाबादचा पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटलेला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तर भाजपने यावरुन रान पेटवलं होतं. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी येथे जलाक्रोश मोर्चा काढला होता.
त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी शिवसेनेविरोधात शिंदे-भाजप लढतीत पाणी प्रश्नावरून रणकंदन माजणार हे निश्चित आहे. कारणही तसंच आहे.
आशियातील सर्वात मोठं जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. मात्र शहराला कुठे सहा तर कुठे सात दिवसांनी पाणीपुरवठा होतो.
शहरातील जुनी जलवाहिनी अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. 1680 कोटी रुपये बजेट असलेल्या नव्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. मात्र ते अत्यंत संथ गतीने.
जुन्या जलवाहिनीला वारंवार गळती होते. ती नादुरुस्त झाली की शहराचा आधीच दिरंगाईने सुरु असलेल्या पाणीपुरवठा अजून लांबतो. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ होते.
नव्या पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याच मुद्द्यावर पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी भाष्य केलं आहे.
आता आम्ही वर्षभरात शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणालेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली.
चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद शहराचे भकास पालकमंत्री होते, अशी सणसणीत टीका त्यांनी केली आहे. मी मात्र शहराचा विकास करणार, असे ते म्हणालेत.
दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गटासात मोठी इनकमिंग होणार असल्याचा गौप्यस्फोटही संदिपान भूमरे यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.