औरंगाबाद : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून (Aurangabad jalna vidhan parishad) निवडून येणाऱ्या एका जागेसाठी औरंगाबाद-जालन्यात मतदान प्रक्रिया पार पडली. औरंगाबाद आणि जालन्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Aurangabad jalna vidhan parishad) प्रतिनिधिंनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये झालेल्या या निवडणुकीत नक्की कुणाचा विजय होईल याची उत्सुकता आता प्रत्येकाला लागली आहे.
शिवसेनेकडून अंबादास दानवे आणि काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांपैकी कोण जिंकणार हे मतपेटीत बंद झालंय. 22 तारखेला मतमोजणी केली जाईल.
महायुतीचं पारडं जड
या निवडणुकीत पहिल्यापासून उत्सुकता खूप वाढली होती. पण चुरस मात्र दिसली नाही. कारण या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी मतदान करत असतात, ज्यात जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीचे प्रमुख पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी हे निवडणुकीचे मतदार असतात. सध्या औरंगाबाद-जालन्यात शिवसेना भाजपच्या मतदारांची संख्या जास्त आहे. यासाठी एकूण मतदार 657 इतके होते. यापैकी महायुतीकडे 330, महाआघाडीकडे 250तर एमआयएम-अपक्ष मिळून 77, मतदार आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेचं पारडं या निवडणुकीत जड समजलं जात होतं.
मतदारांचा शाही थाट
विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार हा मोठ्या प्रमाणात होत असतो. पण या निवडणुकीत मतांची बेरीज शिवसेना-भाजपच्या बाजूने असल्यामुळे घोडेबाजाराला फार वाव मिळाला नाही. पण तरीही धोका नको म्हणून शिवसेना-भाजपने आपले सगळे मतदार हे इगतपुरी इथल्या एका बड्या हॉटेलमध्ये तब्बल पाच दिवस मुक्कामाला ठेवले होते. तर काँग्रेसनेही आपल्या मतदारांची राज्यातल्या एका बड्या रिसॉर्टवर बडदास्त ठेवली होती. पण अपेक्ष उमेदवारांसाठी मात्र या निवडणुकीत घोडेबाजार झाला असावा, अशी शंका जाणकारांनी व्यक्त केली आहे.
दोन्ही उमेदवारांची धाकधूक कायम
शाही बडदास्त घेतलेले मतदार 19 तारखेला सकाळी आपल्या आपल्या मतदार केंद्रावर पोहोचले आणि मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया ही किचकट स्वरुपाची असते, ज्यात पहिल्या पसंतीचं मतदान आणि दुसऱ्या पसंतीचं मतदान करावं लागतं. या पसंतीच्या मतदानाच्या फरकात गोंधळ झाला तर निकाल बदलू शकतो. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची निकाल लागेपर्यंत धाकधूक सुरू असते. त्यामुळे या निवडणुकीत बाणाच्या कपाळी गुलाल लागणार की काँग्रेसच्या पंजा हात उंचवणार हे येणाऱ्या 22 तारखेलाच कळेल.