औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ : गेल्या वीस वर्षापासून एकहाती सत्ता असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा गड ढासळला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलिल यांनी विजय मिळवला. तर अपक्ष हर्षवर्धन जाधव तिसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेसचे सुभाष झांबड चौथ्या क्रमांकावर राहिले. यावेळी चंद्रकांत खैरे यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी होती. बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत रंगतदारपणा निर्माण झाला. औरंगाबाद लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 63.40 टक्के मतदान झालं. 2014 च्या तुलनेत 2 टक्के मतदान वाढलं. 2014 मध्ये इथे 61.85 टक्के मतदान झालं होतं. अखेर इम्तियाज जलील यांनी इथे बाजी मारली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
अपक्ष/इतर | इम्तियाज जलील (VBA) | विजयी |
भाजप/शिवसेना | चंद्रकांत खैरे (शिवसेना) | पराभूत |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | सुभाष झांबड (काँग्रेस) | पराभूत |
बावन्न दरवाजाचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहरावर गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेची एक हाती सत्ता आहे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता, जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता तर शहराचा खासदारही शिवसेनेचा. त्यामुळे औरंगाबाद शहराला शिवसेनेचा गड मानला जात आहे. पण यावेळेला शिवसेनेचा हाच गड गडगडू लागल्याचं चित्र सुरुवातीपासून पाहायला मिळालं. कारण या वेळेला शिवसेनेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत गेल्या वीस वर्षापासून निवडून येणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात निर्माण झालेली anti-incumbency आणि त्यांच्यासमोर निर्माण झालेली अनेक आव्हाने त्यामुळे या वेळेला चंद्रकांत खैरे हे निवडून येतीलच याची खात्री कुणीही सुरुवातीपासूनच देत नव्हतं.
गेल्या वीस वर्षांपासून काँग्रेस सातत्याने औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवत आला आहे. अनेक उमेदवार बदलून सुद्धा काँग्रेसला या मतदारसंघात यश मिळत नाही. खरं तर या वेळेला हा मतदारसंघ बदलण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघाची मागणी सुद्धा केली होती. परंतु ती मागणी मान्य न करता सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी पक्षा समोरच बंड केलं. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारासमोरही पक्षातूनच आव्हाने उभी राहिली. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे राजेंद्र दर्डा यांनी ऐनवेळी सुभाष झांबड यांना ताकद देऊन प्रचारात उडी घेतली. त्यामुळे सुभाष झांबड यांचे पारडं काही प्रमाणात जड झालं. मात्र एमआयएम कडून समोर उभे राहिलेले आव्हान काँग्रेस दुर्लक्षित करु शकली नाही. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी एम आय एमला भाजपची बी टीम म्हणून टीका करत आपला प्रचार पुढे रेटला.
या निवडणुकीत खरी चुरस निर्माण झाली ती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीमुळे. त्यांनी काँग्रेसच्या पारंपारिक मतावर दावेदारी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. परंतु त्यांनी खरं आव्हान निर्माण केलं ते चंद्रकांत खैरे यांच्यासमोर. चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना रजाकाराची अवलाद अशी उपाधी दिली. तर इम्तियाज जलील यांनी धर्माचं राजकारण करणाऱ्यांना पुन्हा तुम्ही निवडून देणार आहात का? असा सवाल विचारला. त्यामुळे या निवडणुकीत चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.
या निवडणुकीत खरा सस्पेन्स निर्माण झाला तो हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीने. हर्षवर्धन जाधव यांनी सुरुवातीला काँग्रेसकडून उमेदवारी मागितली. परंतु काँग्रेसने नकार दिल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष फॉर्म भरला.सुरुवातीला हर्षवर्धन जाधव हे चंद्रकांत खैरे यांना किमान आव्हान निर्माण करतील असं वाटलं होतं. परंतु शेवटी शेवटी मात्र हर्षवर्धन जाधव यांनी एकच फॅक्टर फक्त ट्रॅक्टर अशी घोषणा देत मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या अंगालाही कापरं भरलं. शांतिगिरी महाराज आमदार अब्दुल सत्तार आणि काही मराठा संघटनांनी सुद्धा हर्षवर्धन जाधव यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचे पारडे जड ठरलं खरं, परंतु विजयासाठी इतकी समीकरणं पुरेशी नव्हती हर्षवर्धन जाधव यांचा आत्मविश्वास मात्र कमालीचा दुणावलेला होता.
खरंतर ही पहिली अशी निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये निकालाचा अंदाज सांगणे भल्याभल्या विश्लेषकांनाही अवघड गेलं. या निवडणुकीत चंद्रकांत खैरे पुन्हा निवडून येतील.? की काँग्रेसच्या हाताला लोक साथ देतील.? एमआयएमचा पतंग औरंगाबादच्या आकाशात घिरट्या घालील.? की हर्षवर्धन जाधव यांचे ट्रॅक्टर शिवसेनेच्या शेतावर नांगर फिरवेल हे कुणीच सांगू शकत नव्हतं. त्यामुळे यावेळी औरंगाबादच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक रंजकता निर्माण झाली.
यावेळीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे फॅक्टर निर्माण झाल्यामुळे चंद्रकांत खैरे कधी नव्हे ते कमालीचे घाबरलेले होते. तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांच्यातला आत्मविश्वास खूप काही सांगून जात होता. परंतु त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी सुद्धा अकेला चलो रेची भूमिका घेत आपला सुप्त प्रचार सुरू ठेवला. औरंगाबाद शहरात या चारही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला.