औरंगाबाद : गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत रंगतदारपणा निर्माण झालाय. यावेळी औरंगाबादची निवडणूक ही चौरंगी लढत होताना दिसत आहे.
52 दरवाजांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहरावर गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता, जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता, तर शहराचा खासदारही शिवसेनेचा. त्यामुळे औरंगाबाद शहराला शिवसेनेचा गड मानला जातो. पण यावेळेला शिवसेनेचा हाच गड गडगडू लागलाय. कारण या वेळेला शिवसेनेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. गेल्या 20 वर्षांपासून निवडून येणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात निर्माण झालेली anti-incumbency आणि त्यांच्यासमोर निर्माण झालेली अनेक आव्हाने, त्यामुळे या वेळेला चंद्रकांत खैरे हे निवडून येतीलच याची खात्री कुणीही देत नाही.
काँग्रेससमोर एमआयएमचं आव्हान
गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेस सातत्याने औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवत आहे. अनेक उमेदवार बदलूनही काँग्रेसला या मतदारसंघात यश मिळत नाही. खरं तर या वेळेला हा मतदारसंघ बदलण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघाची मागणी सुद्धा केली होती. परंतु ती मागणी मान्य न करता सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षासमोरच बंड केलं. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारासमोरही पक्षातूनच आव्हाने उभी राहिली. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र दर्डा यांनी ऐनवेळी सुभाष झांबड यांना ताकद देऊन प्रचारात उडी घेतली. त्यामुळे सुभाष झांबड यांचं पारडं काही प्रमाणात जड झालं. मात्र एमआयएमकडून मिळालेल्या आव्हानाला दुर्लक्ष करणं काँग्रेसला परवडणारं नाही. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी एमआयएमला भाजपची बी टीम म्हणून टीका करत आपला प्रचार पुढे रेटला आहे.
या निवडणुकीत खरी चुरस निर्माण झाली ती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीमुळे. त्यांनी काँग्रेसच्या पारंपारिक मतावर दावेदारी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. परंतु त्यांनी खरं आव्हान निर्माण केलंय ते चंद्रकांत खैरे यांच्यासमोर. चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना रजाकाराची औलाद अशी उपाधी दिली, तर इम्तियाज जलील यांनी धर्माचं राजकारण करणाऱ्यांना पुन्हा पुन्हा तुम्ही निवडून देणार आहात का? असाही मतदारांना सवाल विचारला. त्यामुळे या निवडणुकीत चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.
‘एकच फॅक्टर, फक्त ट्रॅक्टर’, हर्षवर्धन जाधवांची घोषणा
या निवडणुकीत खरा सस्पेन्स निर्माण झाला तो पूर्वी शिवसेनेकडून आमदार असलेल्या हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीने. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई असलेल्या हर्षवर्धन जाधवांनी सुरुवातीला काँग्रेसकडून उमेदवारी मागितली. परंतु काँग्रेसने नकार दिल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष फॉर्म भरला. सुरुवातीला हर्षवर्धन जाधव हे चंद्रकांत खैरे यांना किमान आव्हान निर्माण करतील, असं वाटलं होतं. परंतु शेवटी शेवटी मात्र हर्षवर्धन जाधव यांनी ‘एकच फॅक्टर, फक्त ट्रॅक्टर’ अशी घोषणा देत मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या अंगालाही कापरं भरलं. शांतीगिरी महाराज, आमदार अब्दुल सत्तार आणि काही मराठा संघटनांनी सुद्धा हर्षवर्धन जाधव यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचे पारडे जड ठरलं. पण विजयासाठी इतकी समीकरणं पुरेशी नाहीत. तरीही हर्षवर्धन जाधव यांचा आत्मविश्वास मात्र कमालीचा दुणावलेला आहे.
चंद्रकांत खैरेंचा पाचव्यांदा खासदार होण्याचा मार्ग खडतर?
खरंतर ही पहिली अशी निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये निकालाचा अंदाज सांगणे भल्याभल्या विश्लेषकांनाही अडचणीचे ठरू लागलं आहे. या निवडणुकीत चंद्रकांत खैरे पुन्हा निवडून येतील? की काँग्रेसच्या हाताला लोक साथ देतील? एमआयएमचा पतंग औरंगाबादच्या आकाशात घिरट्या घालील? की हर्षवर्धन जाधव यांचे ट्रॅक्टर शिवसेनेच्या शेतावर नांगर फिरवेल हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे यावेळी औरंगाबादच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक रंजकता निर्माण झाली आहे.
यावेळच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे फॅक्टर निर्माण झाल्यामुळे चंद्रकांत खैरे कधी नव्हे ते कमालीचे घाबरलेले होते. तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांच्यातला आत्मविश्वास खूप काही सांगून जात होता. परंतु त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनीसुद्धा अकेला चलो रे ची भूमिका घेत आपला सुप्त प्रचार सुरू ठेवला. सध्या औरंगाबाद शहरात या चारही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळतोय, पण या चारही जणांमध्ये बाजीगर कोण ठरेल हे पाहण्यासाठी 23 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
उमेदवारांच्या संपत्तीची माहिती
चंद्रकांत खैरे, शिवसेना
शिवसेनेकडून चार वेळा खासदार पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात 67 वर्षीय खैरे यांच्याकडे फियाट आणि टाटा सफारी आशा दोन गाड्या आहेत. बीएस्सी प्रथमवर्ष शिकलेल्या चंद्रकांत खैरे यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून 3 कोटी 84 लाखांची मालमत्ता आहे. तर खैरे यांच्यावर तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. मात्र एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही.
सुभाष झांबड, काँग्रेस
काँग्रेस आमदार असलेले सुभाष झांबड पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत. 56 वर्षे वय असलेल्या झांबड यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. स्थावर आणि जंगम मिळून झांबड यांची तब्बल 17 कोटी 95 लाखांची मालमत्ता आहे. इतकी मालमत्ता असूनही झांबड यांच्याकडे एकही वाहन नाही. बीकॉम द्वितीय वर्षापर्यंत शिकलेल्या झांबड यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.
इम्तियाज जलील, एमआयएम
पत्रकार असलेले इम्तियाज जलील आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत. वयाची 50 वर्ष पूर्ण केलेल्या जलील यांच्याकडे डस्टर, टाटा सफारी आणि बुलेट आशा गाड्या आहेत. एमकॉमनंतर पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या जलील यांना, एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दिली आहे. इम्तियाज जलील यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता दोन कोटी 30 लाख रुपये आहे.
हर्षवर्धन जाधव, अपक्ष
शिवसेनेचे आमदार असलेले हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. हर्षवर्धन जाधव यांची स्थावर आणि जंगम मिळून 11 कोटी 80 लाखांची मालमत्ता आहे. फोर्ड आणि पजेरोसारख्या महागड्या गाड्याही हर्षवर्धन जाधव यांच्याकडे आहेत. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव हे लंडनमध्ये शिकलेले एकमेव उमेदवार आहेत. मात्र हर्षवर्धन जाधव यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झालेली आहे. ते प्रकरण आता हायकोर्टात प्रलंबित आहे.