औरंगाबादः छत्रपती शिवरायांप्रती (Chatrapati Shivaji maharaj) अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) आक्रमक आंदोलन करण्यात आलं. उद्या नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं जाणार आहे. तत्पुर्वी मराठा क्रांती मोर्चानेच या महामार्गाचं उद्घाटन करून टाकलं. औरंगाबाद परिसरात या मार्गावर छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवून शिवरायांचा जयघोष करत आंदोलकांनी महामार्गाचं प्रतिकात्मक उद्घाटन केलं.
औरंगाबादजवळ सावंगी बायपासवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. नागपूर ते मुंबई या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्या उद्घाटन होणार आहे. तत्पुर्वी या मार्गावरील औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी बायपास परिसरात कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात निषेध व्यक्त केला.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार तसेच नितीन गडकरी यांच्याशी केली होती. त्यानंतर विविध नेते तसेच संघटनांनी राज्यपालांविरोधात जोरदार आंदोलन केलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केला असून त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटासह, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही केली आहे. यासंदर्भात संसदेच्या हिवाळी अधिवेशनातदेखील आवाज उठवण्यात आला.
मात्र केंद्र सरकारतर्फे भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नसल्याने मराठा क्रांती मोर्चाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रमापूर्वीच असे निषेधात्मक आंदोलन केले.