दत्ता कनवटे, औरंगाबादः महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडवून देणारी बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात नाराज असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आता भाजपातून बाहेर पडावं, एमआयएमला सोबत घ्यावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणावा, अशी खुली ऑफर देण्यात आली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पंकजा मुंडे यांना ही साद घातली आहे. खा. जलील यांची ऑफर पंकजा मुंडे यांनी स्वीकारली तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे.
वारंवार डावलण्याची मालिका
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना मानणारा प्रचंड जनसमुदाय आहे. ओबीसी वर्गाचा मोठा जनाधार त्यांच्या पाठिशी आहे. २०१९ मधील विधानसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर अनेक प्रसंगी पक्षातर्फे त्यांना डावलण्यात आल्याचे चित्र आहे. विधानपरिषदेची उमेदवारी असो की पक्षाच्या नेतृत्वात उभारलेलं आंदोलन, राज्याच्या राजकाराणातून त्यांना दूर ठेवल्याचं चित्र आहे.
संघर्षाबद्दल मनात खदखद
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष असतोच. माझ्याही वाट्याला हा संघर्ष आलाय, त्यासाठी मी तयार आहे. रडणार नाही तर लढणार, अशी मनातील खदखद पंकजा मुंडे यांनी वारंवार मेळावे आणि कार्यक्रमांच्या व्यासपीठांवरून बोलून दाखवली आहे.
औरंगाबादच्या कार्यक्रमात निमंत्रण नाही
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची औरंगाबादमध्ये नुकतीच सभा झाली. या सभेला मराठवाड्यातील महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते.
मात्र इथेही पंकजा मुंडे किंवा त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. अखेरीस पंकजा मुंडे कार्यक्रमाला आल्या, फक्त १ मिनिट भाषण केलं. त्यामुळे आणखीच चर्चांना उधाण आलं.
पंकजा मुंडे यांना खरोखरच राज्याच्या राजकारणातून दूर ठेवलं जातंय का, अशी चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर एमायएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही ऑफर दिली आहे.
पंकजाताई भाजप मधून बाहेर पडा, आणि आम्हाला सोबत घ्या, असं खुलं आवाहन त्यांनी केलंय. भाजपमधून पंकजा मुंडे बाहेर पडल्या तर महाराष्ट्रात मोठा बदल दिसेल. याद्वारे ओबीसी आणि मुस्लिम समाज एकत्र येऊ शकतो, असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.