औरंगाबादः अंबादास दानवे (Ambadas Danve) हुशार आहे. एकनाथ शिंदेंच्या सभेला एवढी गर्दी कशी झाली, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विचारण्याआधीच त्याने आरोप करायला सुरुवात केली, असं वक्तव्य मंत्री संदिपान भूमरे यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेवरून औरंगाबादेत सध्या जोरादार आरोप प्रत्यारोप होत आहे. आज दुपारी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पैठणमध्ये पोहोचतील. या सभेसाठी पैसे देऊन माणसे आणली जाणार असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल करण्यात आली आहे. दोन कार्यकर्त्यांमधील पैशांच्या देवाण-घेवाणीसाठीचं संभाषण यात आहे. संदिपान भूमरेंचे हे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला जातोय. मात्र भूमरेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.
शिंदे यांच्या सभेसाठी पैसे देऊन लोक आणल्याचा आरोप चुकीचा असल्याचं भूमरे म्हणतायत. अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी विरोधी पक्षाचं काम केलं नाही तर त्याला नेता कोण म्हणेल?, असा सवाल त्यांनीकेला.
दानवेंनी आदित्य ठाकरेंच्या सभेला त्याने बिडकीनमध्ये गर्दी जमवली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्येक फाट्यावर स्वागत होणार आहे. लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होतील, अशी खात्री संदिपान भूमरेंनी व्यक्त केली.
शिवसेनेची सभा उत्स्फूर्तपणे होत असते. तिला फार काही करावं लागत नाही. पण यांच्या सभेसाठी ताम झाम करावा लागतोय. गाड्याची व्यवस्था, पैशांची जुळवाजुळव करावी लागतेय. बाजूच्या तालुक्यांतूनही लोक आणावे लागतायत, अशा गोष्टी होतायत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय.
संदिपान भूमरेंच्या स्वतःच्याच कार्यक्रमात मागच्या वेळी 25 खुर्च्या होत्या. ही कमी गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांना आणखी जास्त लोक आणण्याचं म्हटलं असेल, अशी खोचक टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
अंबड, घनसावंगी, पाथर्डीतून तसेच संभाजीनगरच्या बाहेरूनही फोन आल्याचं चंद्रकांत खैरेंनी सांगितलं. 300 रुपये देऊन गाडीत बसा… असंही महिलांना सांगितलंय. बंडखोरांना जे 50 खोके मिळालेत, त्यातून हे वाटप सुरु झाल्याचा आरोप खैरेंनी केलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास औरंगाबादेत येत आहेत. या पार्श्वभूमीवर सभेतील गर्दीवरून शिंदेगट आणि शिवसेनेत मोठी शाब्दिक चकमक सुरु आहे.