चंद्रकांत खैरेंना घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, शिंदे गटाच्या मंत्र्याचा निर्धार, पाहा काय म्हणाले?

| Updated on: Feb 06, 2023 | 1:44 PM

औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वहायला सुरुवात झाली आहे.

चंद्रकांत खैरेंना घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, शिंदे गटाच्या मंत्र्याचा निर्धार, पाहा काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, औरंगाबादः राज्यात एकिकडे पुण्यातील  (Pune)पोटनिवडणुकांनी राजकारण तापलंय. तर दुसरीकडे शिवसेनेचा गढ मानल्या जाणाऱ्या औरंगाबादेत (Aurangabad) लोकसभा निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेनेतील फुटीमुळे शिंदे विरुद्ध ठाकरे असे दोन गट झालेत. त्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. शिंदे-भाजप युती असल्याने भाजप या ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी जोर लावतेय. तर शिंदे गटाचे मंत्रीही जाहीरपणे खासदारकीबद्दल वक्तव्य करतायत. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी तर चंद्रकांत खैरे यांना चॅलेंज दिलंय. 2024 मध्ये चंद्रकांत खैरे यांना पुन्हा घरी बसवू, असं वक्तव्य भूमरे यांनी केलंय.

चंद्रकांत खैरेंच्या नावाची चर्चा…

औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वहायला सुरुवात झाली आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केलाय. मागील वेळी जाधव यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने खैरे यांची मतं फुटली. मात्र 2024 मध्ये खैरे यांनाच पाठिंबा देणार असल्याचं जाधव म्हणालेत.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद शमण्याची चिन्ह आहेत.

संदिपान भूमरेंचं आव्हान..

तर दुसरीकडे पैठणचे आमदार, शिंदे गटाचे नेते संदिपान भूमरे यांनीही लोकसभा खासदारकीची इच्छा प्रकट केली आहे. पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

संदिपान भूमरे यांना पैठण बाहेर कुणीही ओळखत नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय. मात्र 2024 मध्ये कोण कोणाला ओळखतं, हे दाखवून देऊ असं प्रत्युत्तर संदिपान भूमरे यांनी दिलंय.

भूमरे चंद्रकांत खैरेंना थेट आव्हान दिलं.चंद्रकांत खैरे यांना आम्ही १०० टक्के घरी बसवणार, त्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत.

या जिल्ह्याचं सगळं वाटोळं खैरेंनी केलंय. त्यांच्याकडे व्हिजन नव्हतं. आतापर्यंत आम्ही सगळे होतो, म्हणून खैरे होता.. मला तर वाटतं खैरे यांना उमेदवारीच दिली जाणार नाही, ते उभेच राहणार नाहीत, असं वक्तव्य संदिपान भूमरे यांनी केलंय.

भाजपचीही रणनीती जोरात

इकडे शिवसेनेतल्या दोन नेत्यांमध्ये जुंपली असतानाच भाजपनेही लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार रणनिती आखली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचा दौरा केला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हा दौरा असल्याने भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्याकडे खासदारकीसाठी पाहिलं जातंय. कराड यांनीही त्यानुसार जोरदार तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. एकूणच, औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचा हा सामना आतापासूनच चर्तेत आलाय.

एमआयएमलाही आत्मविश्वास

तर २०१९ मध्ये पहिल्यांदाच खासदार झालेले एमआयएमचे इम्तियाज जलील यांनीही आगामी लोकसभा निवडणुकीत विजय माझाच होणार, असा आत्मविश्वास दर्शवला आहे.