औरंगाबादः शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच आदित्य ठाकरेंविषयी आदर असल्याचे वारंवार बोलून दाखवत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी कितीही भावनिक आवाहन केलं तरी शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले आमदार त्यांना प्रतिसाद देत नाहीयेत. औरंगाबादचे आमदार (Aurangabad MLA) संजय शिरसाट यांनी तर आता त्यांच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटो काढल्याचं समोर आलं आहे. शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच दौरा झाला. या दौऱ्याच्या काही दिवस आधी शिरसाट यांनी त्यांच्या ऑफिसमधील हे दोन्ही फोटो काढले. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या शिवसैनिकांपासून सर्वसामान्यांमध्ये एकच चर्चा आहे. एकनाथ शिंदे गटात गेले तरीही बहुतांश आमदार उद्धव ठाकरेंप्रति आदर भाव व्यक्त करत आहेत. मात्र शिरसाट यांच्या या कृतीमुळे शिवसैनिकांमध्ये आणि समर्थकांमध्ये कुजबूज सुरु आहे. शहरातील राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा आहे.
औरंगाबाद शहरातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्याचा प्रकार समोर आला आहे. संजय शिरसाट हे शिवसेनेत असताना त्यांनी आपल्या कार्यालयात दोन्ही बाजूला दोन असे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावले होते. मात्र शिंदे गटात सामील झाल्यानंतर एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर येण्याच्या काही दिवस आधी संजय शिरसाठ यांनी हे फोटो पाठवले आहेत. त्यामुळे सध्या संजय शिरसाट यांच्यावरती टीका होऊ लागली आहे.
औरंगाबादमधील आमदारांना एकनाथ शिंदे गटात जाण्याकरिता मन वळवण्यासाठी आमदार संजय शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं बोललं जात आहे. यासाठीच त्यांना मंत्रिपद मिळेल, अशीही चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या टिकेलाही संजय शिरसाट तेवढ्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना हे सरकार म्हणजे एक दुजे के लिये, असं दोघांचंच, दोघांसाठीच असल्यासारखं आहे, असं म्हणाल्या. संजय सिरसाट यांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देताना म्हटलं, महाविकास आघाडी सरकार अकेले हम.. अकेले तुम असं होतं. एकिकडे उद्धव ठाकरे होते तर दुसरीकडे अजित पवार होते. सुप्रिया सुळेंनी सध्याच्या सरकारची काळजी करण्याची गरज नाही, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.