औरंगाबादः हिंदुत्व कुणाचं? यावरून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये मोठी स्पर्धा लागल्याचं चित्र आहे. आता तर बाळासाहेब ठाकरेंच्या गळ्यात होती, तशा रुद्राक्षांच्या माळेवरून टीका टिप्पण्या सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सहकाऱ्यांनी 1 हजार रुद्राक्ष असलेली माळ भेट दिली आहे. मात्र शिंदेंचं हिंदुत्व (Hindutwa) फक्त दिखावा आहे. ढोंगीपणा आहे. हे डुप्लिकेट हिंदु आहेत. आम्ही खरे हिंदु आहोत. आमच्या हृदयाशी हिंदुत्व आहे. ते आम्ही प्राणपणाने जपतो, असं वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांनी केलंय. आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत, हे दाखवण्यासाठी त्यांनी गळ्यातील रुद्राक्षांच्या माळाही दाखवल्या. टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी कॅमेऱ्यासमोरच या माळा दाखवल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी लवकरच हिंदु गर्व गर्जना यात्रा काढणार आहेत. येत्या 20 तारखेपासून यात्रेला सुरुवात होईल, असं म्हटलं जातंय. राज्यभरात हिंदुत्ववादी विचार अधिक व्यापकपणे रुजवण्यासाठी यात्रा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बाळासाहेब ठाकरेंसारखी रुद्राक्षांची माळ परिधान केल्याने कुणी हिंदुत्वरक्षक होत नाही, असं वक्तव्य खैरेंनी केलं. ते म्हणाले, ‘ हे सगळे नकली, ढोंगी, गद्दार लोक आहेत. यांनी कधी देवाची पूजा करावी?
मला म्हणतात देवपूजा करून सरकार पडत असतं काय़? आता पहा 27 तारखेला पहा काय होतं ते? माझ्या हातात रुद्राक्षांची माळ असते. गळ्यातही असते… असं म्हणत खैरेंनी रुद्राक्षांची माळ काढून दाखवली.
बाळासाहेब ठाकरेंनी देशात जे हिंदुत्वाचं बीज रोवलं, ते तुमच्याकडून होणार नाही, असा टोमणा चंद्रकांत खैरेंनी लगावला. ते म्हणाले, ‘ गर्व से कहो हम हिंदु है…. संपूर्ण देशात फक्त बाळासाहेब ठाकरेच हे ब्रीदवाक्य प्रसिद्ध आहे. हे ब्रीदवाक्यही ते घेत असतील तर हा ढोंगीपणा आहे. उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत हे वाक्य उच्चारतात.. पण शिंदेंचा हा ढोंगीपणा आहे.
एकनाथ शिंदे हिंदु गर्जना यात्रा करणार आहेत… खोटेपणा कशाला करतायत? शिवसेना प्रमुखांनी जे रुजवलं, ते तुमच्याकडून होणार नाही. ते हाटकून शिवसेनेला डिवचण्याचं काम करतायत. म्हणून हा डुप्लिकेटपणा लोकांनाच माहिती आहे…, असं वक्तव्य खैरेंनी केलं.