औरंगाबाद : प्रचंड चुरस, धाकधूक वाढवणारी परिस्थिती आणि नाट्यमय घडामोडी अशा औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत (Aurangabad Zilha Parishad Election) महाविकास आघाडी नशीबवान ठरली, मात्र भाजपनेही मुसंडी मारली. कारण जिल्हा परिषद अध्यक्षपदी समसमान मतं पडल्याने चिठ्ठ्या उडवून ठरवलेल्या निकालात महाविकास आघाडीच्या (Aurangabad Zilha Parishad Election) मीनाताई शेळके विजयी झाल्या. मात्र उपाध्यक्षपदी भाजपच्या एल जी गायकवाड यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या शुभांगी काजवे यांचा पराभव केला.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मीनाताई शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोनगावकर यांना 30-30 अशी समान मतं पडली.
यानंतर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीतही अशीच मतं अपेक्षित असताना, भाजपने बाजी मारुन शिवसेनेला धक्का दिला. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची 2 मतं फुटली. त्यामुळे भाजपला 32 आणि शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ 28 मतं मिळाली.
अध्यक्षपदाची रंजक निवडणूक
अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या मीनाताई शेळके तर भाजपकडून शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. काल त्यासाठी मतदान झालं होतं. मात्र दोन्ही उमेदवारांना 29-29 अशी समान मतं पडली होती. काल दोन झेडपी सदस्य अनुपस्थित होते. दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाल्याने कालची निवडणूक तहकूब करुन आज ठेवण्यात आली होती.
आज पुन्हा मतदान घेण्यात आलं. कालचे दोन अनुपस्थित झेडपी सदस्य आज उपस्थित राहिले. त्यामुळे आज पुन्हा दोन्ही उमेदवारांना पुन्हा समसमान 30-30 मतं मिळाली. त्यानंतर चिठ्ठी उडवून निकाल देण्यात आला. यामध्ये काँग्रेसच्या मीनाताई शेळके विजयी झाल्या. तर शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोनगावकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपची मुसंडी
अध्यक्षपदाच्या निवडीत निराशा हाती आल्यानंतर भाजपने उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुसंडी मारली. भाजपने महाविकास आघाडीची दोन मतं फोडली. त्यामुळे भाजपेच उपाध्यक्षपदाचे उमेदवार एल जी गायकवाड यांना 32 तर शिवसेनेच्या उमेदवाराला 28 मतं मिळाली.
पक्षीय बलाबल
औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक 23 सदस्य भाजपकडे, शिवसेना 18, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 3, मनसे 1, डेमोक्रॉटिक 1 असे पक्षीय बलाबल आहे. गेल्यावेळी शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची मदत घेत आपला अध्यक्ष केला होता.