लखनऊ : उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभेचे उमेदवार आझम खान यांनी अश्लिलतेचा कळस गाठला आहे. आझम खान यांनी अभिनेत्री आणि भाजप नेत्या जयाप्रदा यांच्यावर टीका करताना संतापजनक वक्तव्य केलं आहे. आझम खान यांनी जयाप्रदांवर टीका करताना थेट अंतर्वस्त्राबाबत भाष्य केलं. त्यामुळे आझम खान यांच्यावर चहूबाजूंनी छी थू होत आहे. सपामधून भाजपमध्ये गेलेल्या जयाप्रदा यांच्यावर टीका करताना संघाचा रंग म्हणून खाकी रंग आणि अंतर्वस्त्र यांची तुलना केली. आझम खान यांनी रविवारी रामपूर येथील सभेत जयाप्रदा यांच्यावर संतापजनक वक्तव्य केलं. या सभेला माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवही उपस्थित होते.
रामपूर लोकसभा मतदारसंघात जयाप्रदा विरुद्ध आझम खान यांच्यात सामना होत आहे.
दरम्यान आझम खान यांनी आपण असं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं आहे. “जर माझ्यावरील कुठलाही आरोप सिद्ध झाला, तर मी निवडणूक लढणार नाही. मी माझ्या भाषणात कुणाचंही नाव घेतलेलं नाही”, असा दावा आझम खान यांनी केला आहे.
Azam Khan, Samajwadi Party (SP) in Rampur on his remark, ‘main 17 din mein pehchan gaya ki inke niche ka underwear khaki rang ka hai’: I haven’t named anyone. I know what I should say. If anyone can prove that I named anyone anywhere&insulted anyone,then I’ll not contest election pic.twitter.com/ftDtC57ttA
— ANI UP (@ANINewsUP) April 14, 2019
“मी नऊवेळा रामपूरमधून निवडून आलो आहे. मला माहीत आहे काय बोलायचंय. मी भाषणावेळी कुणाचंही नाव घेतलेलं नाही, जर कुणी हे सिद्ध करुन दाखवेल की मी कुणाचं नाव घेतलं आहे, कुणाचा अपमान केला आहे, तर मी निवडणूक लढणार नाही”, असं आझम खान म्हणाले. आझम खान यांच्या या वक्तव्यमुळे उत्तर प्रदेशसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
“मी माझ्या भाषणात दिल्लीच्या एका व्यक्तीबद्दल बोलत होतो. ती व्यक्ती सध्या आजारी आहे. ती व्यक्ती म्हणाली होती की, मी 150 रायफल्स घेऊन आलो होतो, जर तेव्हा मी आझम खानला बघितलं असतं तर त्याला गोळी मारली असती. ती व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असल्याचं समोर आलं होतं”, असं स्पष्टीकरण आझम खान यांनी दिलं.
अखिलेश तुमचे संस्कार मेले आहेत : जया प्रदा
दरम्यान, आझम खान यांच्या वक्तव्यावर जया प्रदा यांनी संताप व्यक्त केला आहे. “त्यांनी मला शिवी दिली. मी ते सहन करु शकत नाही. मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लोकांनी आता गप्प राहायला नको, आझम खान यांना एकही मत जायला नको”, असं म्हणत जयाप्रदा यांनी आझम खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. जया प्रदा यांनी अखिलेश यादव यांनांही लक्ष्य केलं. “अखिलेश तुमचे संस्कार मेले आहेत. ज्या नेत्यासोबत तुम्ही राहता, ज्यांच्या संगतीत तुम्ही राहता, त्यामुळे तुमचं डोकंही तसंच चालायला लागलं आहे,” असं जयाप्रदा म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशच्या रामपूर इथे रविवारी आझम खान यांची सभा होती. या सभेत आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केलं. “ज्यांना आम्ही बोट धरुन रामपूरमध्ये आणलं. ज्यांनी 10 वर्ष तुमचं प्रतिनिधित्त्व केलं. त्यांची वास्तविकता ओळखण्यासाठी तुम्हाला 17 वर्ष लागली. मी 17 दिवसांत ओळखलं की, त्यांची अंतर्वस्त्र खाकी रंगाची आहेत “, असं आझम खान म्हणाले. यापूर्वीही आझम खान यांनी जयाप्रदा यांना नाचणारी म्हणून संबोधलं होतं.
पाहा व्हिडीओ :