नागपूर | 2 डिसेंबर 2023 : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला सरकारनी अटक करुन दाखवावी मग मराठ्यांची ताकद कळेल अशा आशयाचे विधान केले आहे. यावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना अटक होईल अशी भीती का ? वाटतेय त्याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे. तसेच जरांगे पाटील यांनी ओबीसीच्या काही जातींना न्याय मिळत नाही असा केलेला आरोप वाद निर्माण करणारा आहे. त्यांच्याकडे काही आकडेवारी, कागदपत्रीय पुरावे असतील तर त्यांनी पुढे येऊन द्यावेत अशी मागणी देखील तायवाडे यांनी केली आहे.
आपल्या सरकारने अटक करून दाखवावी असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे. यावर प्रतिक्रीया देताना ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगे पाटील यांनी असं वक्तव्य कुठल्या संदर्भात केले आहे. हे कोणालाच कळून आलेले नाही. त्यांच्या मनात अटक होईल अशी भीती का निर्माण झाली आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावे अशी मागणी तायवाडे यांनी केली आहे. त्यांना कुठल्या कारणाने अटक होऊ शकते त्याची कोणतीही चिन्हं आम्हाला तरी दिसत नाहीत असे तायवाडे यांनी म्हटलं आहे.
जरांगे पाटील यांनी सरकारला जो इशारा दिला आहे. त्याचा विचार सरकारला करायचा आहे. एवढं मोठं राज्य सरकार चालवते. त्यामुळे कुठली कारवाई करायची आणि कुठली नाही याचा विचार सरकार विचार करून घेत असते. अशा प्रकारची वेळ आली तर त्याचा सामना कसा करायचा याचा विचार सरकार करेल आम्हाला त्याचा विचार किंवा काळजी करायची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ओबीसींमधील काही जातींना आरक्षणाचा फायदा मिळत नाही. या मताशी आपण बिलकूल सहमत नाही. आरक्षण म्हणजे प्रतिनिधीत्व. हे प्रतिनिधीत्व त्या-त्या जातीच्या लोकसंख्ये प्रमाणे मिळायला पाहीजे असेही तायवाडे यांनी म्हटले आहे. हा नवीन शोध जरांगे यांनी कुठून लावला आणि कशाच्या आधारावर लावला हे आम्हाला स्पष्ट व्हायला पाहीजे. सर्वांना समान न्याय मिळू शकत नाही. प्रतिनिधीत्व हे लोकसंख्येच्या प्रमाणानूसार मिळत असते. जोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करुन कोणत्या राज्यात कोणत्या जातीचे किती लोक आहेत हे लोकांसमोर यायला हवे. त्यानंतर आरक्षण लागू झाल्यापासून आतापर्यंत कोणाला कुठे आणि किती आरक्षण मिळाले हे स्पष्ट होईल असे बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे याचं वक्तव्य वाद निर्माण करणारे आहे. त्यांनी वाद निर्माण करू नयेत. त्यांच्याजवळ यासंदर्भात काही आकडेवारी, कागदपत्रीय पुरावे असतील तर जगासमोर मांडावेत ओबीसीत भांडणं लावून देऊ नये असेही तायवाडे यांनी म्हटले आहे.