मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिपदांच्या वाटपाच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. शिंदे गटातील आमदारांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. त्यामुळे काही आमदार नाराज असल्याचीही चर्चा आहे. त्यातच आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याही महत्वाकांक्षा वाढल्या आहेत. बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय. प्रहारचे दोन आमदार आहेत, आणि शिंदेंच्या बंडाळीत प्रहारचीही मोठी साथ लाभली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रिपद (Cabinet Ministry) हवं आहे. बच्चू कडू यांच्या मागणीचा सकारात्मक विचार सुरु असल्याचीही माहिती मिळतेय.
बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. त्यातही त्यांना मोठं खातं हवं असल्याचं बोललं जातंय. बच्चू कडू यांनी कृषी, जलसंधारण किंवा ग्रामविकास अशी जनतेशी नाळ जोडणारी खाती मागितल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रहार संघटनेचे दोन आमदार असेलल्या बच्चू कडू यांना कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिंदे गटातील आमदार संजय सिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. औरंगाबादेतून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संदिपान भुमरे यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी संजय सिरसाट मंत्रिपदासाठी अडून बसल्याची माहिती मिळतेय. औरंगाबादेत तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी संजय सिरसाट यांना एखादं महामंडळ किंवा अन्य कोणत्या पदावर बोलवणं होण्याचीच शक्यता वर्तवली जातेय. मात्र संजय सिरसाट हे राज्यमंत्रीच नाही तर कॅबिनेट मंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं कळतंय.
दरम्यान, औरंगाबादेत भाजप नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे आणि प्रशांत बंब हे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे एकट्या शिंदे गटाला औरंगाबादेतून तीन किंवा चार मंत्रिपदं मिळण्याची शक्यता कमीच आहे. असं असलं तरी संजय सिरसाट मात्र मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, शिंदे गटातील नेत्यांकडून त्यांची समजूत काढली जात असल्याची माहिती मिळतेय.