अमरावती : राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) आलं आणि आता कुणाला कोणतं खातं मिळणार? अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. शिंदे सरकारचं खातेवाटप 11 जुलैच्या सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणीनंतर होईल असा एक अंदाज बांधला जातोय. मात्र, शिंदे यांच्या समर्थक आमदारांमध्ये काहींनी आपली मंत्रिपदाची इच्छा लपवून ठेवलेली नाही. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना आपल्याला सामाजिक न्याय खातं, त्यातून अपंग कल्याण मंत्रायल वेगळं काढावं आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा बोलून दाखवलीय. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. मात्र, मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करत असताना आपण जे मिळेल त्यात समाधानी असू, असंही सांगायला ते विसरले नाहीत.
बच्चू कडू म्हणाले की, आमच्यासोबत मतदारसंघाचा प्रश्न असतो. सत्तेत राहून मतदारसंघासाठी पैसा येणार की बाहेर राहून येणार हे आमच्यासाठी महत्वाचं असतं. हे सगळं करत असताना आमच्या मतदारसंघातील लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा असतात. कोरोनाची दोन वर्षे सोडली तर उरलेल्या काळात आम्ही कामगारांच्या किमान हजार बैठका लावल्या. मतदारसंघात दोन प्रकल्प आपण घेतले. या सगळ्या चढाओढीत, तत्व, विचारामुळे आम्ही मतदारसंघ बाहेर सोडावा का? शिंदे साहेबांची मित्रता आणि देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध मजबूत होते आणि ही गरज आहे. सत्तेच्या मार्गातून नवीन वाटचाल निर्माण झाली पाहिजे हे माझं मत आहे.
मंत्रिपदासाठी, पैशासाठी गेले हे चुकीचं आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असतं. माझा विषय अपंग बांधवांचा आहे. अपंगांसाठी राज्यभरात 100 गुन्हे दाखल आहेत. 32 शासननिर्णय काढले. देशात अपंगांसाठी सर्वाधिक निधी महाराष्ट्रात मिळतोय. 1995 चा कायद्याची आमच्या आंदोलनानंतर अंमलबजावणी झाली. माझी इच्छा आहे की सामाजिक न्याय या खात्यात एकतर अपंग कल्याण खातं वेगळं काढावं आणि ते ही पद आम्हाला मिळावं. ज्यातून जो दुर्लक्षित घटक आहे, ज्याचा भाऊही त्याच्याकडे पाहत नाही, त्यांची सेवा करण्याची काम जरी आम्हाला दिलं तरी आम्ही धन्यता मानू. ज्याचं बजेट जास्त ते खातं मोठं असं आम्ही समजत नाही. ज्यात सेवा करण्याची अधिक जास्त संधी आहे, अनेक वंचितांसोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळेल, अनेकांचे अश्रू पुसता येतील, हे जरी दिलं तरी आमची काही मागणी नाही, हट्ट नाही, आग्रह नाही. पण दिलं तर अधिक चांगलं काम कसं करता येईल, या सरकारची प्रतिमा अधिक मोठी कशी करता येईल, यासाठीच आमचे प्रयत्न असतील. सोबतच कार्यकर्त्यांची आणि सगळ्यांची मागणी होती की अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे. या दोन गोष्टीसाठी लोकांचीही मागणी आहे. तो प्रयत्न करतोय, विनंती आम्ही करु, झालं तर ठीक नाहीतर जय राम कृष्ण हरी. आम्ही चांगलं काम करु, असंही बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, खातेवाटपापापत मला त्याबाबत काही माहिती नाही. कुणाला कोणतं खातं मिळेल याबाबत आम्हाला कल्पना नाही. आम्हाला सामान्य माणसांचे प्रश्न महत्वाचे आहेत. सरकार आल्यावर सर्वसामान्य माणसाला काय देता येईल याचाच विचार आम्ही करत आहोत, असंही बच्चू कडू म्हणाले. हे सरकार फार काळ टीकणार नाही. मध्यावधी निवडणुका लागतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मागचं आघाडी सरकार झाल्यावर स्वत: देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते बोलत होते की सरकार पडेल. महिना, दोन महिन्यात पडेल. आता शरद पवार बोलत आहेत. विरोधात असल्यावर असं बोलावंच लागतं. पण हा फेविकॉलपेक्षाही मजबूत जोड आहे. आमची एकनाथ शिंदे यांच्यासोबत मित्रता आहे. आधीही एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरुनच आम्ही आघाडी सरकारसोबत गेलो होतो, असंही त्यांनी सांगितलं.