मुंबई : प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपद न मिळाल्याने मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाताना त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. किंबहुना त्यांना कॅबिनेटमंत्रीपदाचा शब्द दिल्याचंही बोललं जातं. याबाबत बच्चू कडू यांनीही आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. “मंत्रिमंडळाच्या पहिल्या रांगेत असण्याची अपेक्षा होती. मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीमध्ये स्थान असेल, असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही”, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणालेत. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलत होते.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालावेळी बच्चू कडू यांनी एक विधान केलं होतं. पुढचा मुख्यमंत्री आमच्या पक्षाचाच!, असं ते म्हणाले होते. त्याबाबत बोलताना मला पुढे काय घडणार आहे, याची कल्पना नव्हती. मी सहजच आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असं बोलून गेलो होतो, असं बच्चू कडू म्हणालेत.
शिंदेगट बच्चू कडू यांच्या पक्षात सामील होणार असल्याची कुठलीही चर्चा झाली नव्हती. पण तशी परिस्थिती आली असती तर कदाचित शिंदेगट प्रहारमध्ये सामील झाला असता, असं बच्चू कडू म्हणाले.
आमचे आमदार राजकुमार पटेल आधी गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर मीही गेलो. पण माझं असं म्हणणं होतं की, मी जाऊन एकनाथ शिंदेंसोबत काही मुद्द्यांवर बोलून परत येईल, असं वाटलं होतं. पण हे राजकारण आहे. त्यामुळे मलसा तिथून पर येता आलं नाही. कारण आम्हीही जेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी नगरसेवकांना घेऊन बाहेर जातो. तेव्हा त्यांनही आम्ही परत फिरू देत नाही. त्यामुळे तसंच माझ्यासोबतही झालं. हे राजकारण आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात,असं बच्चु कडू म्हणालेत.