अमरावती: शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा (ravi rana) यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर खुद्द रवी राणा यांनीच हा वाद संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. मात्र, असं असलं तरी ग्राऊंड लेव्हलवर परिस्थिती अजून वेगळीच आहे. बच्चू कडू यांचे कार्यकर्ते अजूनही रवी राणा यांच्यावर नाराज असलेलं दिसून येत आहे. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून ही नाराजी प्रकर्षाने दिसून येत आहे.
बच्चू कडू यांनी रवी राणा वादावर उत्तर देण्यासाठी आज अमरावतीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला हजारो कार्यकर्ते लोटले आहेत. तब्बल दहा हजार कार्यकर्ते या मेळाव्याला येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अनेक कार्यकर्ते कुटुंबकबिल्यासह आले आहेत. या कार्यकर्त्यांच्या जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्वांना शिस्त पालन करण्याच्या वारंवार सूचनाही दिल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर रवी राणा यांच्या विरोधात कोणत्याही घोषणा देऊ नका, असं आवाहन करण्यात येत आहे.
मात्र, बच्चू कडू यांचे कार्यकर्ते सूचना ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे. प्रहारच्या या मेळाव्यात कार्यकर्ते भजन आणि गाणी गाताना दिसत आहेत. त्यातून हे कार्यकर्ते राणा यांना थेट आव्हानच देताना दिसत आहेत.
या कार्यकर्त्यांनी आगे आगे जनता है! पिछे जमाना सारा है! मेरे बच्चू भाऊ का एक जलवा निराला है!, असं भजन गायलं. बरं एवढं गाऊन थांबतील ते बच्चू कडू यांचे कार्यकर्ते कसले? या कार्यकर्त्यांनी आणखी एक गाणं गायलं.
जपून रहा रे रवी राणा, बच्चू भाऊ आला रे, असं गाणं हे कार्यकर्ते म्हणत आहेत. हातात वाघ आणि बच्चू कडू यांचे फलक भजन आणि गाणी गायली जात आहे. त्यावरून कार्यकर्ते रवी राणा यांच्याविरोधात संतप्त असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, मेळाव्याच्या परिसरात बच्चू कडू यांचे मोठ मोठे बॅनर्स लावलण्यात आले आहेत. त्यावर झुकेगा नही, असं लिहिण्यात आलं आहे. बच्चू कडू यांच्या बॅनरवरील इशारा हा रवी राणा यांच्या दिशेनेच असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांच्या अमरावती येथील घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.